Special Cafe !
आज सिकंदराबाद मधल्या Deaf Enabled Foundation या संस्थेत कामानिमित्त गेले होते. ऐकू न येणाऱ्या आणि बोलता न येणाऱ्या लोकांसाठी ही संस्था काम करते हे संस्थेच्या नावातून समजतंच. विशेष म्हणजे जिथे आमचं काम चालतं तिथे काम करणारे, हा उपक्रम चालवणारे सगळे ऐकू आणि बोलू न शकणारे आहेत. संस्थेचे अकाउंट्स सांभाळणारी मुलगी आणि समन्वयक दोघंच असे होते जे ऐकू बोलू शकत होते पण Indian Sign Language मधूनही ते उत्तम प्रकारे व्यक्त होत होते. सगळं काम सुरळीत आणि शांततेत सुरू होतं. मी साधारण तिथे दोन एक तास होते. काम करत होते आणि सोबतच आजूबाजूला न्याहाळत होते. कधी कधी आपल्याकडं सगळं आहे हे आपण किती गृहीत धरतो ?
मध्यंतरी लॉकडाऊन च्या काळात Indian Sign Language चा छोटा कोर्स मी केला. त्याचा आज फायदा झाला. पूर्वी अश्या संस्थेत गेल्यावर सगळ्यांशी बोलताना interpreter शिवाय जमायचं नाही . पण आज मोडक्या तोडक्या का होईना पण Indian Sign Language मधून मला सगळ्यांशी संवाद साधता आला. ते काय बोलत होते तेही मला नीट समजत होतं. कुठल्याही मध्यस्थाशिवाय मला त्यांच्याशी बोलता येत होतं.
आपण जेव्हा वेगळ्या प्रांतात जातो मग तो देश असो वा परदेश , आपण तिथली भाषा समजून घेण्याचा एकवार प्रयत्न करतो. काही नाही तर अगदी एखाद दुसरा शब्द शिकून घेतो. मुद्दाम त्या भाषेत व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो. पण हीच गोष्ट जेव्हा वेगळ्या प्रकारे व्यक्त होणाऱ्या लोकांसोबत असतो तेव्हा फारशी करत नाही. मीही करायचे नाही. Interpreter च्या भरवश्यावर सगळं चालायचं. पण आज मात्र हे वेगळं कौशल्य शिकून घेतलं याचा आनंद झाला. आपल्या समाजात वावरणारी ही मंडळी वेगळी म्हणून दुरावली जातात, अनेकदा आपण सहानुभूतीतून त्यांच्यासोबत वागतो किंवा अनेकदा लांबच राहतो. पण भाषा हे असं माध्यम आहे जे माणसाला माणसाशी निखळपणे जोडतं याचा प्रत्यय आज आला. ही भाषा वापरण्याची संधी मला मिळालीच पण संथेतल्या सगळ्यांशी छान जुळवून घेता आलं. तिथे मी वेगळी राहिले नाही.....त्यांच्यातली झाले.
काम संपवून निघताना तिथल्या समन्वयकाने एका मस्त जागी नेले. एक छोटासा कॅफे होता तो. त्याचं नाव " Talking Hands". या संस्थेतून शिकून आणि काम करून तयार झालेल्या मुलांनी हा कॅफे सुरू केला आहे. काही वर्षापूर्वी याच नावाचं मोठं हॉटेल ही सगळी मंडळी चालवत होती. पण गेल्या दीड वर्षात कोरोना काळात हे बंद करावं लागलं आणि हा छोटासा कॅफे त्यांनी सुरू केला.कॅफे मध्ये आत गेल्यावर अगदी सहा सात महत्त्वाचे शब्द आपण sign language मध्ये कसे बोलू शकतो ते रेखाटलं आहे. स्नॅक्स मेनू पण स्वस्त आणि मस्त होता. तिथेही माझी मी ऑर्डर अर्थात sign language मधून दिली. विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था मी बघितल्या आहे ,बघत आहे. त्यात येणारी मुले जेव्हा शिकून मोठी होतात त्यानंतर संस्थेच्या बाहेर पडतात पण त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी कोणी घेत नाही. ही जबाबदारी Deaf Enabled Foundation ने या कॅफेच्या आणि इतर अनेक उपक्रमांमधून उत्तमप्रकारे स्वीकारली आहे.
प्रिया साबणे कुलकर्णी.
30 सप्टेंबर 2021.
Comments
Post a Comment