एका ' कटा 'ची गोष्ट
एक 'कटा'ची गोष्ट.
श्रावणी शुक्रवार असो किंवा होळी,त्यांचं धार्मिक महत्त्व, त्या अनुषंगाने येणारं कर्मकांड या सगळ्यापलिकडे मला हे दिवस आवडतात. त्यातलं प्रमुख एक कारण म्हणजे त्या दिवशी खायला मिळणारी आईच्या हातची पुरणपोळी. अश्या सणासुदीचं तिचं प्लॅनिंग वाखाणण्याजोगं असतं. निगुतीनं केलेलं खमंग पुरण,मन लावून आणि भरपूर वेळ देऊन भिजवलेली सैलसर कणीक, त्यात टाकलेलं अस्सल केशर. बीडाच्या तव्यावर अत्यंत सुरेख लाटलेली पुरण पोळी जेव्हा भाजली जाते तेव्हा सुटणारा तो घमघमाट. तो क्षण शब्दात बांधून ठेवता आला तर .... आणि तुपाची धार सोडलेल्या त्या पुरणपोळीची चव जीभेवर कायम साठवून ठेवता येणे जमलं तर......
आईसारखी पुरणपोळी करण्याचे मी आटोकाट आणि अनेक प्रयत्न केले पण ते जमलं नाही अजून. पण माझ्यामते पुरणपोळी ज्या शिवाय अपूर्ण आहे तो पदार्थ करण्यात माझा कोणी हात धरू शकत नाही.....तो म्हणजे 'कटाची आमटी'. पुरणयंत्रातून पुरण काढून झाल्यावर राहिलेल्या कटाची आमटी करण्याची पद्धत जुनीच. कदाचित हा पुरणाचा कट किंवा डाळीचं पाणी वाया जाऊ नये म्हणून काढलेली शक्कलही असावी . पण या कटाचा जो काही अशक्य पदार्थ 'कटाची आमटी' या नावाखाली केला जातो त्याला तोड नाही. या आमटीच्या स्वादाचे माझ्यासारखे चाहते अनेक असतील. माझी तर 'चाहते'गिरी एवढी टोकाची वाढली आहे की मी खास ही आमटी बनवण्यासाठी पुरणाचा घाट घातले. एकदाच जरा जास्त डाळ शिजवून, त्याचं पुरण करून आणि ते मस्त वाटून ठेवायचं आणि दोनदा तरी भरपेट आमटी बनवता येईल एवढी तजवीज करून ठेवायची. माझ्याबरोबर माझा नवरा देखील या आमटीचा माझ्यापेक्षाही अंमळ जास्त फॅन आहे त्यामुळे ही आमटी करायची आणि मन तुडूंब भरेतोवर खायची असा पायंडाच पडलाय. वर्षातून तीन वेळा तरी नक्कीच हा आमटी महोत्सव आम्ही साजरा करतो. म्हणजे पोळी करताना करतो तस्संच पुरण करायचं आणि पोळी न करता सगळं आमटीसाठी वापरायचं अस्सा " कट " करणारी जी काही दुर्मिळ माणसं असतील त्यापैकी मी एक आहे.
"पुरण पोळी साठी शिजवलेल्या डाळीच्या पाण्यापासून अर्थात कटापासून करण्यात येणारी आमटी", इतकी सरधोपट आणि बुळबुळीत व्याख्या मला अजिबात आवडत नाही. मला वाटतं या वर्णनातून त्या आमटीला न्यायच दिला जाऊ शकत नाही. पुरण केल्यानंतर कढईला घट्ट धरून बसलेलं पुरण आणि पुरण वाटायच्या यंत्रात अडकून पडलेलं पुरण थोड्या पाण्याच्या हबक्यानं हलकेच सोडवावं.इकडं मोहरी हिंग हळदीची फोडणीत मोप कढीपत्ता घालून त्यात ते दाटसर पाणी घालावं. मग खोबरं,लवंग, दालचिनी, मीरे याचं वाटण आणि सोबतीला धने जिरे पावडर घालावी. आता कौशल्य पणाला लावून चिंचेचा कोळ,गूळ आणि मीठ असं काही घालावं की ते रसायन अमृत बनलं पाहिजे. ही मामूली आमटी नव्हेच.तिच्या घमघमाटानं आसमंत भरून जातो , तिच्या दर्शनानं मन प्रफुल्लित होतं, तिच्या चवीनं तो क्षणच अद्भूत होतो. अशी ही कटाची आमटी पंच इंद्रियांना तृप्त करून जाते. आमच्यासारख्या आमटी प्रिय लोकांना मग पुरणपोळीचा विसर पडतो.म्हणजे पुरण पोळी प्रिय आहेच पण कटाची आमटी त्यापेक्षा अंमळ जास्त प्रिय.म्हणजे कसं की रफीच्या एका सुदंर गाण्यात नय्यर किंवा शंकर जयकिशन यांना जितकं आणि जसं महत्त्व आहे अगदी तसचं आमच्या लेखी कटाच्या आमटीला. पुरण पोळीसोबत आमटी खाणे आम्हाला मान्य नाही. कटाची आमटी करताना अश्याच बेतानं करावी की ती दोन दिवस आरामात पुरेल.आम्ही भातात आमटी नाही तर आमटीत भात घालून खातो, प्रसंगी वाटी वाटी आमटी पितोच. थोड्या वेळाने हीच आमटी दही भातात घालावी. सोबत पापड कुरडई असावी आणि आपण एकाग्र चित्ताने ताव मारावा. संध्याकाळी परत आमटी गरम करावी ( microwave मध्ये नाही) परत परत प्यावी...खावी.रात्री फ्रीज मध्ये आमटी जपून ठेवावी. दुसऱ्या दिवशी परत आमटीचा आस्वाद घ्यावा. कालच्यापेक्षा आज आमटी अजून उत्तम लागते. आजचा दिवसही स्वर्गीय आनंदात घालवावा.
वरणा पुरणाच्या साग्र संगीत स्वयंपाकात कटाच्या आमटीला दुय्यम स्थान देणं आम्हाला मान्य नाही. करायची म्हणून केलेली आमटी म्हणजे खरी आमटी नव्हेच. प्रांतानुसार भाषा बदलते तशी ही कटाची आमटीही बदलते. गूळ विरहीत झणझणीत आमटी, आलं लसूण कांदा वापरून केलेली आमटी,खोबऱ्याचं तिखट वाटण करून केलेली आमटी .....या आमटीच नावही बदलतं. पण आम्ही चिंच गुळाच्या कटाच्या अमाटीचे जबरदस्त फॅन. असा अमृत योग कालच जुळून आला आणि आता आमटीची चव आज दिवसभर रेंगाळणार....
प्रिया साबणे कुलकर्णी.
29 मार्च 2021
Comments
Post a Comment