NH 4 आणि बरंच काही !
NH 4 आणि बरंच काही !
जिथं प्रवासाला जात आहोत त्या ठिकाणापेक्षा तिथंपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास अनुभवायचा असतो. तो प्रवास खूप जास्त आनंद देऊन जातो. पुस्तकी वाटलं तरी या वाक्यातला शब्दन शब्द खरा आहे हे पटवणारा प्रवास अनेकदा आम्ही केलाय.... आणि या प्रवासात गेली अनेक वर्ष आम्हाला साथ देतोय तो NH 4.... मुंबई बंगलोर महामार्ग. देशाच्या पश्चिम आणि दक्षिणेला जोडणारा दुवा.
या वाटेवर आम्ही प्रवास करतोय त्याला आता चार दशकं झाली. आईच्या मांडीवर बसून प्रवास करण्यापासून ते आपल्या मांडीवर आपलं तान्हं बाळ घेऊन प्रवास करणं म्हणजे एक वर्तुळ पूर्ण झालं. हा प्रवास अजूनही चालू आहे.
अख्खं आयुष्य पुण्यात काढलं तरी मूळ गाव कोणतं असं विचारलं की "वाई / सातारा " हे जितक्या तत्परतेनं सांगितलं जातं तितकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त तत्परता NH 4 वर प्रवास करण्यात आम्हाला असते.
लहानपणी लाल परी ( हे नाव का पडलं असेल देव जाणे. कारण परी वगैरे वाटावी इतकी सुलभता या प्रवासात कधीच नव्हती ....असो ) , नंतर रेंट वर गाडी, मग स्वतःची गाडी असा प्रवास करत करत NH 4 शी आमचे नातेसंबंध जुळत गेले आणि दृढ झाले.
या प्रवासात आमचा पालकवर्ग सोबत असेल तर त्यांच्या लहानपणीच्या पुणे /वाई /पाचवड /उंब्रज / खंडाळा / आरळे/ औंध / गोंदवले /लिंब / पाल / सातारा या प्रवास आठवणी ( अनेकदा त्याच त्याच...पण तरीही त्या परत परत ऐकताना वाटणारी मज्जा औरच) निघतात. पालक नसतील तर आमच्याही इतक्या वर्षांच्या जुन्या आठवणी निघतात. या रस्त्याची खडान खडा ( आणि खड्डा अन खड्डाची सुद्धा) माहिती असली तरी दरवेळी एक वेगळा अनुभव मिळत जातो. खेड शिवापूर, शिरवळला वाढलेली गर्दी, नव्याने सुरू झालेल्या कंपन्या, नीरेचं अथांग पात्र आणि त्यात असलेलं पाणी ,श्रीराम वडा इथं कशी कायम गर्दी असते , विरंगुळ्याची साबुदाणा खिचडी हे विषय दरवेळी बोलले गेले नाहीत तर तो "फाऊल" ठरतो. माझ्या आणि नवऱ्याच्या वडीलांनी सातारला लहानपणीचा काळ घालवला असल्याने पुणे सातारा सायकल वर केलेला प्रवास,कात्रजच्या घाटातून रात्री सूनसान कसं वाटायचं , सातार वरून उडतरे गावी आजोळी केलेला बैलगाडीतून प्रवास इत्यादी सगळ्या त्यांच्या त्यांच्या आठवणी दरवेळी काढल्या जातात. आणि पूर्वीचा पुणे सातारा रस्ता कसा आता राहिला नाही यावर एकमत होतं.
पूर्वी या महामार्गावर लागणारी अनेक गावं आता उड्डाणपूल झाल्याने दिसतच नाहीत. पण आमच्या मनात मात्र ती गावं आणि त्यांचं location इतकं चपखल बसलं आहे की प्रत्यक्ष गावं दिसली नाहीत तरी तशीच पूर्वीसारखी असल्याचा feel येतोच. पुण्यापासून सातारा पर्यंतचा प्रवास हा सुजलाम सुफलाम भूमीतून होतो. आजूबाजूला हिरवा गार निसर्ग, शेतं हे सगळं मन ताजतवानं करतात. खंबाटकी घाटात असलेलं दत्ताचं देऊळ दिसलं की पटकन हात जोडले जातात. तिथे थांबलो तर लहानपणी एसटी मधून न चुकता केलेला नमस्कार आणि जोरात देवळात पडेल या बेताने भिरकावलेलं आठ आण्याचं नाण आठवतं.या रत्यावर गेल्या अनेक वर्षात अनेक बदल झाले तरीही काही ठिकाणं जशीच्या तशी आजही उभी आहेत. त्यातलंच हे छोटंसं देऊळ. याशिवाय शिरवळ जवळ रस्त्यावर एक जुनी पाणपोई आहे.
आई बाबा सोबत असताना लहानपणी निश्चिंत झोपून केलेले सगळे प्रवास आठवतात. गाडी लागते या भीतीने घाट चालू झाला की सोबत ठेवलेली प्लॅस्टिकची पिशवी आठवते. अनेक चांगल्या आणि कधी वाईट किंवा नकोशा कामासाठी केलेला प्रवास आठवतो. वाईला आमच्या गणपतीच्या देवळात गणेश जयंतीला दरवेळी वेगवेगळ्या मंडळीना देऊळ दाखवायला आवर्जून केलेले सगळे प्रवास स्मरतात. कॉलेज मध्ये असताना मैत्रिणींसोबत एकटीने केलेला एसटी प्रवास आणि केलेली धम्माल आठवते. लग्नानंतर देवदर्शनासाठी केलेला प्रवास,लहानग्या ऋचाला घेऊन औंधला केलेला प्रवास, भावाच्या लग्नाचं देवाला आमंत्रण देण्यासाठी केलेला प्रवास , दोन वर्षाच्या भाचीला घडवलेला NH 4 चा खास प्रवास आणि कोकणात किंवा गोव्याला कुठंही ट्रीपला गेलो की येताना दरवेळी वाई किंवा साताऱ्यात थांबून घेतलेलं देवदर्शन आणि ठराविक ठिकाणी थांबून केलेला पाहुणचार ,अनेक लग्न,मुंजी, डोहाळे जेवणी, बारशी ,तीस तीन मेव्हणी....... बाप रे......NH 4 म्हटलं की हे सगळंच्या सगळं क्षणार्धात डोळ्यापुढे येतं.
पाचवड आलं की लांबवर समोर दिसणाऱ्या डोंगर रांगा बघून हा पांडवगड, ते पाचगणी टेबल land , भूईंज आलं की दिसला जरंडेश्वरचा डोंगर, सातारा आलं की दिसणारा अजिंक्यतारा अशी चर्चा सुरू होतेच.माझ्या माहेरचे देव म्हणजे वाईचा गणपती ,पालचा खंडोबा आणि देऊरची मुधाई देवी आणि सासरचे देव म्हणजे औंधची यमाई, पालचा खंडोबा आणि आरळ्याची वडजाबाई त्यामुळे पुणे सातारा प्रवासात अनेकदा देवदर्शन घडतं. सातारचा खिंडीतला गणपतीला जाणं म्हणजे एक पर्वणीच असते.पहाटे, सकाळी, दुपारी ,संध्याकाळी,रात्री आणि अपरात्री अश्या सगळ्या प्रहरात आणि ऊन पाऊस थंडी या सगळ्या मौसमात NH 4 चा प्रवास आम्ही केलाय.महामार्गावर झालेल्या अनेक छोट्या मोठ्या बदलांचे आम्ही साक्षीदार आहोत. कोकण, गोवा ,कर्नाटक अश्या कुठल्याही प्रवासातून परतत असताना का कोणास ठाऊक पण सातारा आलं की आलंच आता पुणे असा feel येतो.
या महामार्गाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दुतर्फा असलेली खाद्यपदार्थांची रेलचेल. जोशी वडापाव , सातारी कंदी पेढे, कैलास भेळ , भैरवनाथ मिसळ, श्रीराम वडा, विरंगुळा इथली खिचडी आणि भाजणीचं थालीपीठ, मानस मध्ये मिळणारा तूप घातलेला इंद्रायणी भात आणि शेंगदाण्याच्या म्हाद्या,चुलीवर केलेलं भेंडीपासून मटणापर्यंत सर्व काही, टोल नाक्यावर मिळणारे पेरू, काकड्या, उकडलेले शेंगदाणे, गेला बाजार बॉबी आणि seasonal स्ट्रॉबेरी..... सगळं काही या मार्गावर मिळतं. खेड शिवापूरला भरणारी मंडई आणि रस्त्यावर मिळणाऱ्या पालेभाज्या आणि कृष्णा काठची वांगी. एवढी सुबत्ता फक्त आणि फक्त NH 4 वर बघायला मिळते.
टोल नाक्यावर असलेल्या गर्दी पेक्षा किंवा आता रस्त्याचे जे काम चालू आहे त्यामुळे होणाऱ्या त्रासापेक्षा प्रवासाचा आनंद आम्हाला जास्त असतो कारण वाई किंवा सातारला जातोय म्हणून एक आनंद असतो आणि परतताना पुण्याला येतोय हे सुख असतं. त्यामुळे दोन्ही प्रवास तितकेच आनंदमय होतात.या रस्त्याशी आमचं एक घट्ट नातं आहे त्यामुळे तो निर्जीव न वाटता सजीव वाटतो. अनेक भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलणारा आणि आमच्या भावनांशी एकरूप होणारा आमचा सखा वाटतो. कधी कधी अनेक प्रसंग, ठिकाणं, वास, चवी, माणसं आणि आठवणींनी गुंफलेला एक kaleidoscope वाटतो .काही रस्ते आपल्या घराजवळून जाणारे असतात, काही गावाजवळून जातात तर काही शहराजवळून जातात. पण पूर्वाश्रमीचा NH 4 आणि आत्ताचा NH 48 मात्र आमच्या मनाच्या जवळून जातो.
प्रिया साबणे - कुलकर्णी.
८ ऑक्टोबर २०२३
Comments
Post a Comment