मित्रो.... (पुण्याची ) मेट्रो

 मित्रो.... (पुण्याची ) मेट्रो


कालच पुणेकरांची partial स्वप्नपूर्ती होऊन छोट्या route वर का होईना पण मेट्रो सुरू झाली. फर्स्ट डे फर्स्ट शो बघणं, सगळ्यात आधी म्हणजे इतर मंडळी तिथे जाऊन येण्याआधी आपण जाऊन यायलाच हवं, असा कधीच माझा हट्ट नसतो. आत्तापर्यंत असं काही कधीही जमवलं नाही आणि त्याच सोयरं ना सुतक.एवढं सगळं सांगतेय कारण अगदी पहिल्या दिवशी नाही पण दुसऱ्याच दिवशी पुण्याच्या मेट्रो मध्ये बसण्याची इच्छा झाली ( त्याला सोप्या भाषेत खाज म्हणता येईल) आणि केवळ इच्छा नाही तर इच्छापूर्ती करायला घरातून two wheeler काढून आम्ही गरवारे कॉलेज काढलं. आम्ही म्हणजे मी आणि नवरा. मुलीला फारसा इंटरेस्ट नव्हता. आधी अनेकदा मेट्रोत बसल्यामुळे असेल कदाचित. पण तसं तर आम्ही पण बसलोच होतो की पण अस्सल पुणेकर असल्याचं शाबूत करावं म्हणून हा खटाटोप. 


 नुकत्याच कोरोना संकटातून बाहेर पडल्यासारखं वाटतंय हे प्रत्येकानं लावलेल्या मास्क मुळे थोडं वाटत होतं एवढंच .पण बाकी pre COVID era असल्यासारखं सगळं वातावरण होतं. तिकीट काढायला पेशवे पार्क मध्ये फुलराणीला जशी गर्दी अगदी तशीच  होती आणि उत्साहही तेवढाच. आता जायचचं तर वनाझ पर्यंतच जावं आणि तसंच परत यावं असा विचार करून दोन तिकीटं काढली. साडेसात ला चार मिनिटे कमी होती त्यामुळे धावत निघालो. ( गाडी चुकली तर हात देऊन गाडीत घेणारं आता कोण भेटणार? म्हणून आपणच आपली गाडी वेळेत पकडावी ) तर मध्येच ,जे सिनेमात दाखवत नाहीत, ते पुढे आलं. checking booth. त्यात बॅग checking. पर्स का आणली असं वाटून चिडचिड करत ती यंत्रात ढकलली. माझ्या आधी एक कॉलेज ची मुलगी होती आणि तिच्या सॅक मध्ये स्टेशनरी पाऊच मध्ये कात्री निघाली म्हणून स्कॅन करणारी व्यक्ती तिच्याशी हितगुज करण्यात गर्क होती. इकडे या सगळ्यात माझी आणि पुढच्या मंडळीच्याही बॅग्स अडकल्या. त्यात स्कॅन करणारी बाई त्या मुलीला म्हणाली ," परत येताना कात्री घेऊन जा". परत जाताना ? काही गणित जुळेना मुलीला. "परत कशाला येऊ मी ? मला आयडीयलला जायचयं".. इति मुलगी. आता तिचं पुढे काय झालं हे बघत बसण्याएवढा वेळ नसल्याने माझी बॅग मीच पुढे यंत्रात ढकलून तिकडून बाहेर काढून पुढे निघाले. मागच्या मंडळींनी मम म्हटलं हे सांगायला नको.


तर धावत पळत मेट्रो गाठली. म्हणजे मेट्रोनेच आम्हाला गाठलं. गाठलं कसलं गोठलं. वातानुुकूलितनं नाही हो....गर्दीने गोठून गेलो पार. मुलीने घरी बसून शहाणपणा केला असं मनात येऊन गेलं. असो आता आलोय ना ,तर मस्त जाऊ असं मनाला पटवत होतो तेवढ्यात दारं बंद झाली. लोकांनी जल्लोष केला.


मेट्रो निघाली. असं वाटतयं तोवर परत दरवाजे उघडले. क्षमतेपेक्षा जास्त लोकं झाली की काय असं वाटून दारात उभ्या असणाऱ्या काही लोकांनी मेट्रो बाहेर जाऊन पण बघितलं. पण दरवाजे परत बंद होईनात. वातानुकूलित यंत्रणा असूनही गर्दी प्रचंड असल्याने त्यानेही मान टाकली आणि प्रचंड उकडायला लागलं. सुमारे १५ मिनिटे गेल्यावर परत दारे बंद झाली आणि( चढलेली सगळी मंडळी निग्रहाने स्वतःला मेट्रो मध्ये सामावून घेत )  मेट्रो सुरू होण्याची वाट बघायला लागली. नसती खाज दुसऱ्या दिवशी इथे येण्याची, असं प्रत्येकाच्या मनात आलं असेलच. तेवढ्यात " ए चाय गरम .....चाय गरम्ममम" असा typical आवाज आला आणि मेट्रोत लोकलचा फील आला. चहावाला नव्हता पण एका त्रस्त माणसाने इतर त्रस्त माणसांना जरा हसवण्याचा प्रयत्न केला आणि क्षणभर सगळे हसलो. 


लगेचच मेट्रो सुरू झाली. सुटकेचा निःश्वास टाकणार तोच पुढचं स्टेशनच आलं. नळस्टॉप. मेट्रो सुरू होता होता थांबली असं वाटलं. काही मंडळी उतरतील या वेड्या आशेवर सगळीच मंडळी होती. पण सगळ्यांची घोर निराशा. सगळे आमच्यासारखे पुणेकर मेट्रोतून फिरू म्हणून आलेले आणि सगळ्यांनी वनाझ पर्यंत रिटर्न तिकीट काढलेलं. काही मंडळी उतरणे सोडा अजून काही लोकं आत आली.  कसं बसं खाली बघून नळस्टॉप चौक गेला, पानाच शौकीन गेलं, रांका ज्वेलर्स गेलं.... उगाचच हे बघत होतो. तेवढाच time pass. खरं सांगते मेट्रो सुरू झाल्यावर वरच्या बार ला धरण्याचा प्रयत्न केला पण तिथेही हात ठेवायला जागा नव्हती. या गर्दीत पडणं सोडा आम्ही हलू पण शकत नसल्याचं जाणवून आम्ही नुसते आधाराशिवाय उभे राहिलो. तर मंडळी मजल दर मजल करत वगैरे नाही अवघ्या काही मिनिटात वनाझ आलं.


आता परत गरवारे गाठायचं आणि हीच गाडी रिटर्न जाणार अश्या भाबड्या विचाराने आमच्यासारखे काही लोक्स तिथेच जागा पकडून बसले. तेवढ्यात शुद्ध मराठीत announcement झाली की परत जाण्यासाठी दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर जायचं आहे आणि रिटर्न तिकीट काढलेल्या लोकांनी पण तिकडेच जायचं आहे. म्हणजे आमच्यासारखे अनेक भाबडे होते तर. Announcement पुरेशी नव्हती का काय म्हणून एक माणूस प्रत्यक्ष सांगायला आला की गाडीतुन बाहेर पडा. हा डबा परत जाणार नाहीये. माणसं पटापट बाहेर पडून पल्याड गाडी पकडायला धावली. पण आम्ही नाही धावलो (टूक टूक ) कारण आता परत तोच अनुभव हे साक्षात् दिसत होतं समोर. पलीकडे गाडीची वाट पाहणारी गर्दी बघून आम्ही ola करण्याचा निर्णय घेतला. 


मग काय रिकाम्या मेट्रो मध्ये उभं राहून ,बसून,गाडीबाहेर येऊन वगैरे फोटो सेशन करून आम्ही परतीची रिक्षा पकडली. कधी नव्हे ते रिक्षावाले काका लगेच हो पण म्हणाले आणि गरवारेला आमची two wheeler गाठून आम्ही back to pavilion. येताना आपली two wheeler बरी असं एकदा तोंडभरून म्हणून घेतलं.पण अर्थात लांबच्या route साठी मेट्रोची खूप मदत होईल आणि मेट्रोला भरभरून पुणेकर प्रतिसाद देतील हीच आशा. 


स्वदेस  चित्रपटात शेवटी खूप कष्ट करून एक दिवा लागतो आणि म्हातारी बाई म्हणते " बिजली" . मला त्या म्हतारीच्या जागी मी दिसले  आणि बिजली ऐवजी मी " मेट्रो " म्हटल्याचा भास झाला.


प्रिया साबणे - कुलकर्णी.

७ मार्च २०२२

Comments

Popular posts from this blog

लूडो

एका ' कटा 'ची गोष्ट

पळसधरी