उटी : एक वेगळा अनुभव !
या सुट्टीचा काय प्लॅन ? उटी....
असं उत्तर देणारी तमाम जनता बंगलोर ते उटी या मार्गावर ट्रॅफिक मध्ये ताटकळत गाडीत बसलेली बघितली. ऑफिस , प्रोजेक्ट्स deadlines , शाळा, क्लासेस या सगळया राम रगाड्यात निघायचं म्हणजे बहुतेकदा सगळे एकाच सुमारास निघतात. त्यामुळे airport वर एक get together होऊ शकेल इतकी ओळखीची मंडळी भेटतात. पुढे ही सगळी गर्दी उटी पर्यंत साथ देत होती. जरा गर्दीपासून दूर जाऊ असं म्हणत आपण ट्रीप प्लॅन करावी आणि इकडे नाही तेवढी गर्दी तिकडे मिळावी.
असो...आता उटी बघूया म्हणून सगळी ठिकाणं गर्दीत बघितली. ठिकाणं अर्थात उत्तम होती ...वातावरण उत्तम होतं फक्त गर्दी चा उद्रेक झाला होता. पण माणूस प्राणी तसा चिवट. एवढं सगळं होऊनही उटी आणि कून्नूर मध्ये काही अशी ठिकाणं आम्हाला सापडली जिथे आम्हाला We Time आणि आमच्यातल्या प्रत्येकाला Me Time मिळाला. त्याच भ्रमंतीचा हा लेखाजोखा.
उटीतील ठराविक लेक आणि बागा यांना छेद देत आम्ही पायकरा लेक , एमराल्ड आणि अवलांचे लेक गाठले. सकाळी लवकर उठून पायकरा लेक मध्ये केलेलं बोटींग अत्यंत सुखावहं होतं. स्वच्छ वातावरण आणि गर्दीच्या आधी पोहोचल्यामुळे शांतपणे संपूर्ण लेक बोटीतून बघताना निवांत क्षण मिळाले. याशिवाय पायकरा धबधबा देखील देखणा आहे.धबधबे उंच असतात पण हा तसा नव्हता. अथांग पसरलेला लेक आणि उतारावरून जाताना खळाळत जाणारं पाणी दिसतं. पुढे जाऊन पाणी अजून खोल खाली पडतं पण तिथवर जाता येत नाही. जिथं जाता येतं तिथून मात्र जे दृश्य दिसतं ते विहंगम आहे.
उटीपासून साधारण २०-२४ किलोमीटर अंतरावर अजून दोन लेक आहेत... एमराल्ड आणि अवालांचे लेक (अवालांचे लेक जवळ 'पेहेला नशा' या गाण्याचं शूटिंग झालं असं वाचनात आल्यामुळे तर हे ठिकाण बघावं असं मनानं घेतलंच होतं) उटी पासून या ठिकाणी जाणारा रस्ता एकच. पाच एक किलोमीटर आधी एमराल्ड लेक लागतो आणि नंतर अवालांचे लेक . हा रस्ता आणि प्रवास दोन्ही अशक्य भारी.नुकताच पाऊस झाल्याने हिरवाई अंमळ जास्त होती. डोंगरावर लावलेले चहाचे मळे विस्तीर्ण पसरले होते. स्वच्छ निळे आकाश. डोंगराच्या माथ्यावर सागाची झाडं आणि त्याचे तुरे. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर हे डोंगरावरचे तुरे निळसर भासत होते.त्यामुळे अख्खे डोंगरच निळे भासत होते. खऱ्या अर्थाने निलगिरी. या निलगिरीतून काढलेल्या नागमोडी वाटा आम्हाला पुढे नेत होत्या. उतरत्या छपराची कौलारू रंगीबेरंगी घरं, चहाच्या मळ्यांना पाणी मिळावं म्हणून अधून मधून उडणारे पाण्याचे फवारे, अधेमधे फ्लॉवरची (भाजी) लागवड, चरणाऱ्या गायी,कधी तीव्र उतार तर कधी अवघड जिकिरीेनं चढावा असतं चढ, अश्या रस्त्यावरून प्रवास सुरू होता.कधी कधी इतकी झाडी की सूर्यप्रकाश आत येत नव्हता. तुरळक वहानं होती. त्या निळ्या हिरव्या रंगात अत्यंत सुबक कलाकुसर पण अत्यंत भडक असे रंग असणारे छोट्या छोट्या देवळांचे कळस उठून दिसत होते. शुभ्र पांढरी आणि आकाशी रंगाची चर्चही लक्ष वेधून घेत होती.रस्त्यात कुठे छोटी देवाची मिरवणूक किंवा भक्तीगीतं सोडली तर फक्त वाऱ्याचा आवाज.असा सगळा रस्ता पार करत घाटाच्या रस्त्यात एका वळणावर एमराल्ड लेक दिसला.पावसाळ्यात असतं तेवढं पाणी नव्हतं. लेक पर्यंत चारचाकी जाईल असा रस्त्याही नव्हता ( दुचाकी जाऊ शकते) त्यामुळे या तलावाचं दुरूनच दर्शन घेतलं. हे दूरदर्शनही मोहक होतं. जिथून लेक छान दिसेल अश्या ठिकाणी गाडी उभी करून शांतपणे थांबलो.सभोवतालची हिरवाई आपलं प्रतिबिंब तलावातल्या पाण्यात बघत असावी म्हणूनच या तलावाला एमराल्ड नावं पडलं असावं.
या पाचूच्या प्रदेशाची सफर पुढे चालू राहिली ते अवलांचे लेक पर्यंत. काय आणि किती बघू, किती फोटो काढू असं झालं. अथांग चहाचे मळे, सागाची झाडं, रेखीव रस्ते.
एक चेक पोस्ट लागलं. जिथे गाडीचे ४० रुपये आणि माणशी २० रुपये अशी एन्ट्री फी घेतली गेली.इथून पुढे प्लास्टिक चालणार नाही असं सांगितलं गेलं, चेकिंग केलं गेलं. जवळच छोटी टपरी होती. एकूण निर्मनुष्य रस्ता पाहता पुढे काही मिळेल ना मिळेल असं वाटून पाण्याच्या काचेच्या बाटल्या आणि बिस्किट्स असं काही सोबत घेतलं. पुढे बराच वेळ काहीच दिसेना ...ना माणसं ...ना लेक. मग काही वेळानं पार्क केलेल्या चार पाच गाड्या आणि टुमदार बुकिंग ऑफिस दिसलं. गाडी लावली आणि ऑफीस मध्ये गेलो. तिथं समजलं की इथून एक दोन तासांची जीप सफारी आहे. आम्हाला बघायचे होते असे एक दोन स्पॉट ज्यात भवानी माता मंदीर होतं.पण तिथे जीप नेणं आता बंद केल्याचं समजलं. तिथले रस्ते अत्यंत धोकादायक असल्याचं कारण सांगितलं. त्यामुळे जीप सफारीला जायचं नाही असं ठरवलं. शेजारी पाईन झाडांच्या रांगा होत्या. तिथून थोडं पुढं चालत गेलं की अवालांचे लेक होता. पावसाळा संपल्याने इथं पण पाणी कमी होतं आणि पाण्यापर्यंत जायला जरा पायपीट करावी लागली. सर्वात जास्त काय आवडलं तर तिथली शांतता. विविध पक्षांचे आवाज, उंचच्या उंच पाईन झाडातून केलेली भ्रमंती, लेकच्या काठी शांतपणे बसून अनुभवलेला निसर्ग. विशेष म्हणजे अश्या ठिकाणी एक टुमदार हॉटेल आहे. तिथे साधेच पण चविष्ट जेवण उपलब्ध होते.अर्थात त्याची चव चाखली. शेजारी एकअगदी छोटं चर्च आहे. वनखात्याच्या अखत्यारीत हा सगळा प्रदेश असल्याने शिस्त आहे, ती पाळली जाते, प्लास्टिक किंवा इतर कचरा अजिबात दिसला नाही. परदेशात जसे लोक ट्रेल करतात किंवा कॅम्प साईटला जातात आणि निवांत पणा अनुभवतात अगदी तसाच अनुभव इथे घेता आला.
असाच अनुभव कुन्नूर मध्येही आला. एकतर उटी ते कुन्नूर हा toy train चा प्रवास शब्दातीत. दिल से मधलं 'चल छैया छैया 'हे गाणं शूट झालेलं तीच ही ट्रेन. कुन्नूरचं स्टेशन पण तितकंच सुरेख. निळी कौलारू दुमजली इमारत, स्वच्छ प्लॅटफॉर्म, कुन्नूर लिहिलेली स्टेशन वरची ती पिवळी पाटी आणि स्टेशन वर आम्हाला घेऊन येऊन निवांत दम खात उभी असलेली ती छोटीशी आगगाडी. डोळ्यात साठवून ठेवावं असं दृश्य.
कुन्नूर हे गाव मुळात शांत वाटलं. निम्मं गाव चढावर वसलेलं.त्यात आम्ही ज्या होम स्टे मध्ये होतो तो अजून अफलातून होता. चहाच्या मळ्यातच होता तो. त्यातून खोलीत एक अख्खी भिंतच काचेची होती. तिथे उत्तम सिटिंग केलं होतं आणि बाहेर फक्त आणि फक्त चहाचे मळे आणि हिरवेगार डोंगर. भली मोठी गॅलरी.कुठंही न जाता तिथेच बसलो तरी चाललं असतं अशी भारी जागा. या सगळ्यामुळे क्षणार्धात कुन्नूरच्या मी प्रेमात पडले.
त्यानंतर आम्ही वेलिंग्टन लेक बघायला बाहेर पडलो. याआधीचे तीन अफलातून लेक आम्ही बघतले होते त्यामुळं हा कसा असेल अशी उत्सुकता होतीच. आधीच्या तीन तलावांच्या तुलनेत हा तसा छोटासा लेक होता. पण खूपच सुबक. या तलावाचे व्यवस्थापन आर्मी कडे आहे. शिवाय प्रवेश शुक्ल देखील आहे. आत प्रवेश केला तेव्हा आम्ही सोडले तर अजून सहा सात लोकं तिथे होती. तलावाच्या कडेने सुंदर रस्ता आहे. तिथं वेगवेगळी अनेक फुलझाडं लावली आहेत. छोट्या छोट्या हिरव्यागार टेकड्या आहेत. बसायला छान बेंच आहेत. लहान मुलांसाठी छोटी पार्क आहे. बोटींग देखील करता येतं. या ठिकाणी आम्ही तासभर बसलो. तलावा भोवती फेरफटका मारला. फोटो काढलेच पण तिथल्या निसर्गाची मज्जा जास्त लुटली. कुन्नूरला येऊन फक्त या ठिकाणी दिवस दिवस बसायला मी एका पायावर तयार आहे.
थोडक्यात उटी आणि कुन्नूर इथल्या नेहेमीच्या टुरिस्ट डेस्टिनेशन वर गाठ पडलेली गर्दी दूर लोटून या काही ठिकाणी आम्हाला जाता आलं.निसर्ग लाखो हातांनी देत असतो आणि ते घ्यायला आपली झोळी तोकडी पडते. गारवा, हवेत असणारा ताजेपणा,शांतता आणि ती शांतता भंगू न देणारी माणसं ,असं मस्त कॉम्बिनेशन या सगळ्या ठिकाणी होतं....इथली भ्रमंती यासाठीच कायम मनाजवळ राहणार.
प्रिया साबणे - कुलकर्णी.
२८ मे २०२३.
Comments
Post a Comment