अनोखी भ्रमंती पुण्या जवळची

 पुण्याजवळ अशी अनेक  ठिकाणं आहेत जी एका दिवसात बघून होतात.त्यातलीच काही ठिकाणं बघण्याचं आज ठरवलं.मी शाळेत असताना ,बहुधा आठवी नववीत असताना, आमची शैक्षणिक सहल ज्या ठिकाणी गेली होती तीच सफर आज ऋचा सोबत करावी असं वाटलं. गेली दोन वर्ष शाळाच बंद असल्यानं educational excursion वगैरे होणं अवघडच. म्हणून मुद्दाम भूगोलाच्या पुस्तकातल्या गोष्टी प्रत्यक्ष बघायला गेलो.


तर पाहिलं ठिकाण होतं निघोज आणि या गावातले कुकडी नदीत नैसर्गिक रीत्या तयार झालेले रांजणखळगे अर्थात Volanic rock cut pots. अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात हे गाव आहे. पाण्याच्या खळाळत्या प्रवाहामुळे रांजणाच्या आकारासारखे खोल असे तयार झालेले हे खळगे बघण्यासारखे आहेत. पावसाळा सोडून कधीही इथे हे रांजणखळगे नीट बघता येतात. रांजणखळगे नीट बघता यावे यासाठी एक gallery बांधली आहेच. शिवाय एक जुना झुलता पूल पण आहे.या पुलाच्या अलिकडे पुणे जिल्हा आणि पलीकडे नगर जिल्हा. मळगंगा देवीचं कुकडी नदीच्या काठावरचं मंदिर छान आहे आणि आज फारशी गर्दी नसल्याने संपूर्ण परिसर छान शांत होता.


पण तरीही खंत वाटावी अशी एक गोष्ट बघायला मिळाली. ती म्हणजे काही रांजण खळग्यांची लोकांनी बनवलेली कचराकुंडी.इतकं महत्त्वाचं ठिकाण, त्याला असलेलं भौगोलिक महत्त्व, ते जतन करणं खूप लांब राहिलं पण ते निदान घाण करू नये याचंही भान नाही. काय करता येईल याबद्दल? जर कुठली संस्था किंवा चळवळ हे काम करत असेल तर मला यासाठी जोडून घ्यायला आवडेल. 


याच पारनेर तालुक्यातलं पुढचं ठिकाण होतं ते वडगाव दर्या. निघोज पासून वडगाव दर्या हे ठिकाण २१ किमी अंतरावर आहे . साधारण एक तास लागला. हे ठिकाण दर्याबाई आणि वेल्हाबाई या दोन देवींचे (ज्या एकमेकींच्या बहिणी आहेत असे मानले जाते ) देवस्थान. पण यासोबत भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं असं हे ठिकाण. या स्वयंभू देवींचे स्थान ज्या गुहेत आहे तिथे अधोमुखी लवणस्तंभ ( stalactite ) बघायला मिळतात. चुनखडी असलेल्या गुहांमध्ये  हे लवण स्तंभ तयार होतात. पाण्यात विरघळलेल्या चुनखडी आणि इतर खनिजांच्या निक्षेपणापासून ते तयार होतात. चुनखडी म्हणजेच कॅॅल्शियम कार्बोनेट हे कार्बन डायॉक्साईडयुक्त पाण्यात विरघळते आणि कॅल्शियम बायकार्बोनेटचे द्रावण तयार होते.हे द्रावण खडकातून झिरपून जेव्हा एखाद्या गुहेच्या छतातून बाहेर येते, तेव्हा हवेच्या संपर्कामुळे chemical reaction होते आणि चुनखडीचे कण छतावर साठतात. छता कडून जमिनीकडे आलेल्या अश्या स्तंभांना अधोमुखी लवणस्तंभ म्हणतात. ( शाळेत असताना बघितलेले हे लवणस्तंभ आणि त्याचा  केलेला अभ्यास प्रयत्नपूर्वक आठवावा लागला ) असे हे लवणस्तंभ देवीच्या गुहेत आहेत. त्यातून अखंड पाणी झिरपत असतं. या गुहेपर्यंत यायला ५० -६० एक पायऱ्या खाली उतराव्या लागतात आणि अनेक माकडांशी सामनाही करावा लागतो.पण हे ठिकाण must visit या प्रकारात आहे. 


आजचं तिसरं ठिकाण 'टाकळी ढोकेश्वर'.   वडगाव दर्या पासून अगदी १२ किमी वर होतं म्हणून जायचं ठरवलं. साधारण ६ व्या ७ व्या शतकात खोदली गेलेली ही सुंदर लेणी  आहेत आणि या लेण्यात शंकराचे देवस्थान आहे. एक मोठे मुख्य लेणे आहे. त्यात आत अनेक कोरीवकाम केलेल्या मूर्ती बघायला मिळतात आणि जवळच एक खोल खोदलेले पाण्याचे टाके आहे. निघोज आणि वडगाव दर्या ला गेल्यावर हे ठिकाणही नक्की बघावं असंच आहे. अत्यंत शांत परिसर,थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर खाली दिसणारं सुरेख दृश्य आणि लेणी सगळंच चुकवू नये असं.


प्रिया साबणे कुलकर्णी.

५ फेब्रुवारी २०२२.

Comments

Popular posts from this blog

लूडो

एका ' कटा 'ची गोष्ट

पळसधरी