पळसधरी
आज निमित्त ऑफिसच्या "team buidling activity" चं होतं. याआधी रिसॉर्ट किंवा तत्सम ठिकाणी जाऊन दिवस घालवणं हे ठरलेलं. पण आज एकत्र आलो ते एका सुरेख ठिकाणी. पुरखों की हवेली वगैरे. याला बंगला वगैरे म्हणण्यापेक्षा हवेलीच म्हणायला हवं इतका सुंदर हा वाडा. दिवाडकर कुटुंबाचा (कल्पना दिवाडकर आमच्या वरीष्ठ अधिकारी त्यांचा हा वाडा) हा वडिलोपार्जित वाडा. दिवाडकर कुटुंब मूळचं कर्जत जवळ पळसधरी इथलं आणि याच ठिकाणी हा वाडा आहे. कल्पना दिवाडकर यांचा पाहुणचार आज लाभला. पाहुणचार कसा असावा याचा उत्तम अनुभव मिळालाच पण त्यासोबत या वाड्याची ओळख झाली.
१९३०-३६ या काळात बांधलेला हा दगडी वाडा, अगदी आखीव रेखीव, अगदी बघताच क्षणी मनाचा ठाव घेतो. वाड्याच्या अवती भोवती आमराई आहे. शिवाय चिक्कू आणि फणसाची झाडं आहेत. वाड्यामागे मोठा तलाव आहे . आजूबाजूला नीरव शांतता आणि स्वच्छता. वाड्यात ज्यांनी हा वाडा बांधला त्यांचे फोटो आहेत, दिवाडकर कुटुंबाचा फोटो आहे. एका कोपऱ्यात या वाड्याचं सुरेख रेखाटन आहे. एक देवाघर असलेली खोली आणि पाच बाकी प्रशस्त खोल्या आहेत. मोठ्ठा दिवाणखाना आणि मागच्या बाजूला लाकडी कठडा असणारा मोठ्ठा आडवा व्हरांडा . शेजारी स्वयंपाक खोली जिथे सध्या वाड्याचे care taker म्हणून काम करणारं कुटुंब राहतं. परसदारी विहीर आहे , भरपूर झाडे आहेत .
कल्पना मॅम वाड्याबद्दल भरभरून सांगत होत्या. त्यांच्या आजे सासऱ्यांनी हा वाडा बांधला. तेव्हा आत शेणाने सारवलेल्या जमिनी होत्या, वीज नव्हती. यथावकाश हळूहळू सगळ्या सोयी झाल्या. पण दिवाडकर कुटुंबानं वाड्याचं वाडापण टिकवून ठेवलं आहे. सर्व कुटुंबीयांनी मिळून एक फंड तयार केला आहे ज्यातून डागडुजी आणि इतर खर्च वेळेवर केला जातो.
खूप काही fancy सोयी न करता वाडा साधाच ठेवला आहे आणि म्हणूनच आत गेल्या गेल्या आपलेपणा वाटतो, घरपण अनुभवता येतं. दीवाडकर कुटुंबीय दर गणेशोत्सवात एकत्र येतात, मनोभावे रीतीनुसार गणेश स्थापना होते, पूजाअर्चा, नैवेद्य सगळं रीतसर होऊन दीड दिवसाच्या गणपतीचं मनोभावे मागच्या तळ्यात विसर्जन केलं जातं. आजच्या काळात इतकं मोठं कुटुंब दरवर्षी एकत्र येऊन हा उत्सव साजरं करतं हे अप्रूप आहे.
कल्पना मॅम ने आम्हाला काही जुने अल्बम (फोटो) दाखवले. भावंडांनी वाड्यात केलेली धमाल, लेकी सूनांनी एकत्र येऊन वाड्यात घालवलेले क्षण, पोरा सोरांनी आजी आजोबा आणि नातेवाईकांसोबत घालवलेला वेळ, जवळच्या पळसधरी स्टेशनवर काढलेला त्या काळचा फोटो,मागच्या तलावात मनसोक्त घालवलेले क्षण, सगळं काही त्या अल्बम मध्ये बघायला मिळालं. फोटोतील सगळी मंडळी अर्थात ओळखीची नव्हती पण त्यांचं या वाड्यात एकत्र नांदणं आणि जुने दिवस बघताना मज्जा आली.
वाड्याच्या आजूबाजूला मस्त फेरफटका मारला. नंतर एक छोटा trail पण केला. आमराईतून चालत पुढे गेलो आणि वाड्यामागचा तलाव अजून जवळ जाऊन बघितला. स्वच्छ पाणी आणि नीरव शांतता. मग अजून थोडं पुढे जाऊन पळसधरी स्टेशनवर आलो. शांत निर्मनुष्य स्टेशन, स्टेशन मास्तरचं ऑफिस, स्टेशनच्या नावाची पाटी आणि स्वच्छ प्लॅटफॉर्म. कितीतरी वर्षांनी असं स्टेशन बघितलं.परतीच्या वाटेवर मोहरलेल्या आमराईत झाडाखाली शांत बसलो. आमराईची देखभाल, मध्यंतरी वीज पडून झालेलं झाडांचं नुकसान, तिथे पिकणारा आंबा या सगळ्या गप्पा सुरू होत्या.
गप्पांच्या ओघात कल्पना मॅमचं वाड्याशी असणारं घट्ट नातं जाणवत होतं. वाडा आणि वाड्याच्या आजूबाजूच्या प्रत्येक घटकाशी असणारा त्यांचा परिचय आणि त्याबद्दल त्यांना वाटणारं कुतूहल आणि आत्यंतिक जिव्हाळा हाही जाणवत होता. त्या भरभरून सांगत होत्या आणि जणू अनेक वर्ष आम्ही या वाड्यात फिरून आल्याचा भास आम्हाला होत होता.वाड्यात घालवलेला आजचा दिवस आणि टीम बिल्डिंग उपक्रम कायम स्मरणात राहील यात शंका नाही.
अश्या जुन्या वास्तूत फिरायला मला फार म्हणजे फारच आवडतं. मला त्याबद्दल समजून घ्यायला आवडतं, त्या काळात कसं काय काय असेल याची मनोमन कल्पना करायला आवडते आणि ती वास्तू निर्जीव न राहता माझ्यासाठी ती सजीव होते. सजीव होते ती तिथल्या माणसांच्या आठवणीतून.
प्रिया साबणे -.कुलकर्णी.
१३ मार्च २०२२.
Comments
Post a Comment