कोकण ... परत परत

 चला कुठेतरी भटकून येऊ असं म्हणत परत एकदा कोकण गाठलं. कशेळी, कनकादीत्य मंदीर, गणेश गुळे , आरे वारे ,पूर्णगड, गणपतीपुळे असं एक दोन दिवस भटकत शेवटी गाडी उक्षी नावाचं ठिकाण शोधत निघाली. थिबा पॅलेस आणि रत्नदुर्ग बघून गर्दी मागे पडत गेली आणि गाडी एका सड्यावर पोहोचली. गूगल उक्षीचा रस्ता दाखवत असलं तरी नेमकी हवी ती जागा सापडत नव्हती. रस्त्यावर नावाची पाटी अगदी शोधून एखाद दुसरी. मग कोकणात पत्ता विचारायची जुनी पद्धत अमलात आणून कातळशिल्पाचं नेमकं ठिकाण शोधत गेलो. आणि एका वेगळ्याच कालखंडात आमची गाडी येऊन थांबली. आम्ही पाच जण सोडून दूर दूर पर्यंत माणूस दिसत नव्हता. 


कोकणातल्या यावेळच्या भटकंतीचा अफलातून Finale आम्ही अनुभवत होतो. कोकणात काही वर्षापूर्वी जी काही कातळशिल्पं सापडली त्यापैकी दोन उक्षी परिसरात आहेत. आणि त्यातल्या एका कातळ शिल्पा जवळ आम्ही होतो. शिल्पाच्या बाजूने दगड रचून छान कुंपण केलं आहे. हा परिसर आणि शिल्पांचं नीट जतन व्हावं यासाठी प्रयत्न चालू आहेत याच्या खाणाखुणा दिसत होत्या. पण शिल्पाबद्दलची बाकी काही माहिती लिहिली नव्हती. आता आपण आपलं डोकं ,तर्कबुद्धी वापरून आणि कल्पनाशक्ती ताणून सगळं काही बघायचं होतं.दगडी कुंपणावर चढून आजूबाजूनं फेरफटका मारला. हजारो वर्षापूर्वीचा माणूस नेमका काय विचार करत असेल? काय सांगायचं असेल त्याला म्हणून त्याने हे शिल्पं घडवलं असेल ? आणि मुळात नेमकं कोरलंय काय ? आमच्यापैकी प्रत्येक जण काही काळ मनातच चर्चा करत राहिला आणि शांतपणे शिल्पं बघत राहिला. अगदी १३ ते ७५ वर्ष सगळ्या वयोगटाच्या माणसांच्या मनात कुतूहल निर्माण केलं या कातळशिल्पानं .


उभ्या भिंतीवर कोरलेली शिल्पं  बघितलेले आम्ही पहिल्यांदाच अशी जमिनीवरच्या दगडावर कोरलेली शिल्पं बघत होतो. कल्पनाशक्तीला ताण दिला तर आपल्याला खूप काही मज्जा सापडतात. एकाला पोपटासारखा पक्षी कोरलाय असं वाटलं तर कोणाला तो मासा वाटला. शेवटी पक्षी अथवा प्राणी आहे हे नक्की केलं. एक शिल्प तर चक्क चारचाकी गाडीसारखं वाटलं. एक लाकडी फणी असावी असं वाटलं तर एक मोठं फुलं कोरलय असही वाटलं. माणसाचा चेहरा ,डोळे कोरले आहेत असं वाटलं. स्वस्तिकाचा आकारही एके ठिकाणी वाटला. जे जसं दिसतं ते तसं असेलच असं नाही. किंवा आपण ज्याला जे समजतो त्याला दुसरी व्यक्ती काही वेगळंच समजत असेल. असा साक्षात्कार व्हायला फारसा वेळ लागत नाही. इथं सगळी कातळशिल्पं अशीच आहेत. 


माणूस जेव्हा पहिल्यांदा व्यक्त होऊ बघत असेल तेव्हा त्यानं हीच शिल्पं का काढली? आजूबाजूला जे दिसत,जे अनुभवता येतं तेच व्यक्त केलं जातं. म्हणजे या कातळावर कोरलेले पक्षी, प्राणी , इतर आकृत्या प्रत्यक्ष त्याकाळी कोकणात असतीलही किंवा  त्या काळच्या माणसाने आपली स्वप्ने, आपल्या आकांक्षा पण कोरल्या असतील. त्यांना मूर्त रूप दिलं असेल. गंमत अशी की यापैकी कोणतीच शक्यता नाकारता येत नाही आणि कोणतीच स्वीकारताही येत नाही. 


या कातळशिल्पावरून थोडं पुढे गेलं की अजून एक भन्नाट कातळशिल्पं बघायला मिळालं. १८ बाय १२ फुटी भव्य हे कातळशिल्पं बघायला आता तर्क वितर्क लागणार नव्हते कारण एक मोठा हत्ती कातळावर कोरला आहे हे एका नजरेत कळलं.इथेही दगडी कुंपण आहे आणि  थोड्या उंचीवर उभं राहायची सोय पण आहे. जिथे उभं राहून हत्ती शिल्प अगदी नीट बघता येतं. त्याकाळी Arial view ची सोय नसताना जमिनीवर एवढं मोठं आणि सुबक शिल्प कसं काय कोरलं असेल ? हत्तीचे पाय,पायाची पाच बोटं, सोंड, शेपटी, डोळे सगळंच नीटनेटकं. फक्त सूपासारखे कान मात्र चौकटीच्या डिझाईनच्या चौकोनात कोरले होते. कदाचित चारचौघांपेक्षा वेगळा विचार केला असेल त्या काळच्या माणसाने. पण हे शिल्प मात्र खूपच मोठं आणि नीटनेटकं आहे.


व्यक्त होणं हा माणसाचा स्थायीभाव. आपली मतं, आपली स्वप्न, आपले विचार, आपल्याला भेसाडवणारे प्रश्न आणि भीती माणूस वेळोवेळी वेगवेगळ्या कृतीतून व्यक्त करतो. व्यक्त होण्याच्या या धुंदीत सोशल मीडिया नावाची जादूची गुहा पण माणसाला आता गवसली  आहे. व्यक्त होण्याची हीच मुभा हजारो वर्षापूर्वीच्या माणसाकडे होती आणि त्यावेळी त्याच्या परीने त्यानेही अनेक युक्त्या लढवल्या. त्यातलीच एक शक्कल बघण्याचा हा अनुभव खास होता.  कातळशिल्पं बघता बघता डोक्यावरचा मे महिन्यातला सूर्य पश्चिमेकडे कलला.संधिप्रकाशात कातळ जास्तच गडद झाला आणि त्यावर कोरलेलं शिल्प अजून गहिरं झालं. 


आमच्या सारख्या सामान्य पर्यटकांनाही काही काळ खिळवून ठेवण्याची किमया या कातळशिल्पांनी केली. तज्ज्ञांना हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाच्या उत्क्रांतीच्या अनेक खुणा या निमित्ताने सापडतील. ही आणि अशी अनेक कातळशिल्पं कोकणात अनेक ठिकाणी सापडली आहेत. ती बघणं हा अनुभव शब्दातीत असणार. हजारो वर्षांपूर्वीच्या माणसाच्या सृजनतेला दाद द्यावी असं वाटत असेल तर अशी अनोखी कोकण भ्रमंती करायलाच हवी. 


तळटीप : उक्षी ( Ukshi) या गावाचा रस्त्या गूगल मॅप वर व्यवस्थित उपलब्ध आहे. फक्त नेमक्या ठिकाणी पोहोचायला रस्त्यावरच्या वाटसरूंची मदत घेता येते. गणपतीपुळे ते उक्षी कातळशिल्प हे अंतर साधारण २५ ते ३० किमी आहे. 


प्रिया साबणे - कुलकर्णी.

Comments

Popular posts from this blog

लूडो

एका ' कटा 'ची गोष्ट

पळसधरी