वारी !
अशी कुठली गोष्ट आहे जी शेकडो वर्षे वारकऱ्यांना पंढरपूरला पायी जाण्यासाठी प्रवृत्त करते ? पंढरीनाथाबद्दल अपार भक्ती, त्याला बघण्याची , तो असण्याचा अनुभव घेण्याची जबरदस्त आस, वारीला जाण्याची वर्षानुवर्षांची घरची परंपरा, सदा सर्वकाळ असणाऱ्या सुख दुःखापासून काही काळ मनाने खूप लांब जायची मुभा , वर्षातून एकदा वारीतच ओळख झालेल्या मैत्राला भेटायची ओढ , की नुसतीच एक अचाट गोष्ट अनुभवण्याची मजा की अजून काही.
मला हा प्रश्न अनेक वर्ष पडायचा अजूनही पडतो. अशी काय विलक्षण गोष्ट आहे ज्यामुळे मैलानुमैलाची पायपीट त्रास न वाटता आनंदसोहळा वाटतो. ऊन ,पाऊस,वारा यांचा परिणाम क्षुल्लक वाटतो. आपापली गावं, घरं, माणसं सोडून मुखी पांडुरंगाचं नाव घेत अनेक दिवस फक्त चालत राहायचं. तहान , भूक, विश्रांती, झोप, जुने आजार, दुखणी ,खुपणी या सगळ्या जाणीवा आहेतच पण त्याचा बाऊ न करता चालत राहायचं. यात बहुसंख्य मंडळी ही अनेक पावसाळे बघितलेली . अशी कोणती गोष्ट आहे जी सगळ्यांची पाऊले पंढरीच्या वाटेवर आणते.
त्यांच्यासोबत थोडी वाट चालून बघू मग कळेल असं वाटलं आणि आळंदी गाठली. सकाळी देवळात दर्शन घेऊन निघाले. पालखी पुढे गेली होती आणि ती गाठायला जरा जोरात चालत निघाले.जाताना दिंडी पताका, तुळशी वृंदावन घेऊन भजनात , गजरात दंग झालेले वारकरी होते. काही बायका मंडळी डोक्यावर स्टीलचा पण फुलांनी छान सजवलेला पाण्याचा घडा घेऊन चालत होत्या. चालता चालता तहानलेल्या वारकऱ्याला पाणी देत होत्या. हे सगळं बघत बघत चालत होते. चार किमीचा टप्पा कधी पूर्ण केला कळलंच नाही. समोर सजवलेली पालखी दिसायला लागली. धावत जाऊन दर्शन घेतलं.छान वाटलं. एकदम फ्रेश. मग जे चालत निघाले ते थेट विश्रांतवाडी पर्यंत चालत होते.
चालताना एखाद्या दिंडीसोबत जायचं ठरवत होते आणि तेवढ्यात पुढे एक दिंडी दिसली.विशेष म्हणजे दिंडी लांबून ओळखता यावी म्हणून झेंडे पताकावर रंगीबेरंगी फुगे आणि चेंडू लावले होते. दिंडीतला एक जण डोईवर स्पीकर घेऊन चालत होता आणि दुसरा माईक वर विठू माऊलीचा गजर करण्यात मग्न होता. बाकी सारे एकाच गतीने चालत होते.चालताना ठेका धरत होते, नाचत होते, गुणगुणत होते. रस्ता छोटा होता. वाहनं अजिबात नव्हती. भजनाचा आवाज सोडला तर बाकी आवाज नाही. त्यांच्यासोबत दिघीतला टप्पा कसा पार केला कळलंच नाही. त्यांच्यासोबत ठेका धरत मी चालत गेले. तहान नाही लागली आणि थांबावंस वाटलं नाही. मोठा टप्पा पार केला. माझाच माझ्यावर विश्वास बसत नव्हता. सध्या चालायची वेळ फारशी येत नाही आणि एकावेळी मुद्दाम एक दोन किमी पेक्षा जास्त मी चालत सुद्धा नाही. आणि बघता बघता १२ किमी झाले.
विश्रांतवाडीला माझे आई वडील भेटले. ते देखील आता माझ्यासोबत चालत पुण्यात येणार होते. दिंडी सोडली तसे माझे पाय बोलायला ( actually बोंबलायला ) लागले. पण माझ्यापेक्षा वयाने मोठे आई बाबा चालत असताना कुरकुर करणं बरं नाही म्हणून चालत राहिले. रस्त्यात क्षणभर विश्रांती घेणारे , दोन घटका फुगडी खेळून ,रिंगण करून मनोरंजन करणारे वारकरी दिसत होते. मिळेल ते जेवून विश्रांती घेणारे वारकरी अचानक पाऊस आल्यावर सामान उचलून लगेच चालू लागले. चेहेऱ्यावर चिडचिड नाही, कंटाळा नाही.
हे सगळं बघूनच कदाचित घरापर्यंत चालत पोहोचण्याची स्फूर्ती मिळाली....२१ किमी चं अंतर पार पडलं.
रस्त्यात अन्न वाटप करणारी मंडळी,तिथेच खाऊन अन्न किंवा ते ठेवलेल्या प्लेट्स टाकून दिलेल्या दिसल्या. कचरापेटीचा अभाव होता. केळीच्या सालांनी रस्ता भरून गेला होता. या सगळ्यात अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असणारी अशक्य अस्वच्छ शौचालये आणि त्यामुळे हे सगळे विधी रस्त्यावर आडोशाला करणारी मंडळी. अनेक ठिकाणी डोंबाऱ्याचा खेळ करणारी मुलं आणि कुटूंब दिसली. सगळं दिसत होतं, बोचत होतं. त्यासाठी काय करता येईल किंवा कोणी काही करत असेल तर त्यांना मदत करावी असं ठरवलं आहेच.
पण हे सोडलं तर अनुभव विलक्षण होता. माझ्याकडे भक्तीभावाचा, सहनशीलतेचा, फिटनेसचा अभाव होता, पायात गोळे आले होते. पण असं असतानाही मी चालू शकले. कुठेही मध्ये सोडून देऊन बसावं, असं वाटलं नाही. असं कसं झालं ते काही कळलं नाही .
अशी कुठली गोष्ट आहे जी शेकडो वर्षे वारकऱ्यांना पंढरपूरला पायी जाण्यासाठी प्रवृत्त करते ? याचं उत्तरही मला काही सापडलं नाही किंवा ते शब्दात मांडता येणारं नाही किंवा ते शब्दात मावणारं नाही.
प्रिया साबणे कुलकर्णी
२२ जून २०२२
Comments
Post a Comment