मेणवलीचा वाडा
॥ मेणवलीचा वाडा ॥
वाई हे ठिकाण मला नवीन नाही. हे आमचं मूळ गाव, त्यामुळे लहानपणीपासून इथं सतत येणं होतंच. वाईचं ग्रामदैवत म्हणजे धुंडीविनायक गणपती. हे मंदीर शिवाजी महाराजांनी देखरेखीसाठी साबणे कुटुंबीयांकडे सोपवलं आणि तेव्हापासून आजपर्यंत या मंदिराची व्यवस्था साबणे परिवार करतो. साबणे कुटुंबाचा भाग असल्याने गणेश जयंतीला उत्सवात येणं होतं आणि इतर वेळीही अनेकदा होतं. याशिवाय ढोल्या गणपती दर्शन, कृष्णा बाईचा उत्सव असताना तिचे दर्शन आणि जवळच असणारा मेणवलीचा घाट बघणे हे ठरलेलंच.त्याचप्रमाणे घाटाला लागून असणारा नाना फडणवीस वाडा देखील आधी बघितला होताच. शेंदूरजणे इथे असलेल्या Mapro ची भर यादीत नव्याने पडली आहे.
पण काल जेव्हा पुन्हा एकदा मेणवली गाठलं तेव्हा मिळालेला अनोखा अनुभव आवर्जून सांगावा असाच आहे. नेहमीप्रमाणे आमच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन मेणवलीच्या वाटेनं निघालो.नेहमीप्रमाणे अर्धवर्तुळाकार सुदंर घाट बघायचा. मेणवलेश्र्वराचं मंदीर दर्शन, पोर्तुगीज मोठी घंटा बघायची आणि साधारण अर्ध्या तासात पुढील प्रवासाला निघायचं असं ठरवलं होतं. पुढे धोम धरण आणि नृसिंह मंदिर बघायचं असं ठरवलं होतं.पण मेणवलीला पोहोचल्यावर नाना फडणवीस वाडा फक्त उघडाच नव्हता तर दारात माहिती असणारी भिंतीपत्रकं दिसली. दारातच एक वाड्याचं चित्र आणि नाव असा लोगो असणारे जाकीट घातलेली एक दोन मंडळी वावरताना दिसली. गाडी पार्क करून तिकडेच मोर्चा वळवला आणि एक मस्त सरप्राइज दिसलं. वाड्यात आल्यावर एक काउंटर होतं Entry fee साठी. तिथे ऑडियो गाईड ची पण सोय होती. वाड्याच्या उत्तम व्यवस्थापनासाठी काही देणगी देऊ इच्छित असल्यास तिथे देण्याची सोय होती. souvenir म्हणून वाड्याचं रेखाटन असलेली fridge magnets होती आणि त्यावर तुमचं नाव मोडी लिपीत लिहून मिळत होतं. इतकी वर्ष सामसूम असलेला हा वाडा आज चैतन्याने भारलेला होता.तिथे असणारी मंडळी अत्यंत शांतपणे आणि तन्मयतेने माहिती देत होती. अत्यंत माफक असे प्रवेश शुल्क भरून आम्ही वाड्यात प्रवेश केला.या प्रवेश शुल्कात वाड्याची माहितीही दिली जाते. वाड्याचा काही भाग दुरुस्तीसाठी किंवा वैयक्तिक कारणासाठी फडणवीस कुटुंबाने बंद ठेवला असला तरी जो भाग बघता येतो तो अत्यंत देखणा आहे.
साधारण दीड ते दोन एकरात पसरलेला हा आखीव रेखीव वाडा आत प्रवेश केल्यावर आपल्याला जुन्या काळात घेऊन जातो. १७७० मध्ये बांधलेला हा पूर्वाभिमुख वाडा कृष्णा नदीकाठी आहे. चार बाजूला टेहळणी बुरूज आहेत. नगारखाना, दुभत्या जनावरांसाठी गोठा, विहीर, कोठ्या आणि सहा चौक असलेला सुरेख वाडा. या वाड्याची माहिती आणि फोटो Google वर उपलब्ध आहेतच. पण समक्ष वाडा बघणे हा एक नितांत सुंदर अनुभव होता. आत घेऊन येणारा दिंडी दरवाजा, आल्या आल्या मुख्य गणेश चौकात असलेली ढोल्या गणपतीची मूर्ती, मग पडवी, लाकडी दारावर असलेलं सुरेख कोरीव काम, वरच्या मजल्यावर दिवाणखाना, पंगतीचा चौक , खलबतखाना, गणेश सोप्यात छतावर असलेलं कोरीवकाम त्यावर नैसर्गिक रंगांनी रंगवलेली फुलं आपलं लक्ष वेधून घेतात.पूर्वी बायकांच्या हळदीकुंकू सारख्या समारंभासाठी असलेली राखीव जागा म्हणजे या वाड्याचा सर्वांग सुदंर भाग वाटला मला. या चौकात रेखीव पुष्करणी आहे. सायफन पद्धतीने विहिरीतलं पाणी या पुष्करिणीत त्या काळी आणलं जायचं. याशिवाय वाड्यात काही सुदंर अशी जुनी भिंतीचित्र देखील आहेत.
सगळ्या वाड्याची सुरेख माहिती तिथले गाईड देतात, शिवाय कुठल्या angle ने फोटो काढल्यावर छान येईल याच्या टिप्स पण देतात. वाड्याचा मुख्य दरवाजा ( जो बंद होता पण मेणवली घाटा वर गेल्यावर तो दिसतो) घाटावर घेऊन जातो.
सुस्थितीत असलेला हा जुना वाडा फिरून मन त्या वाड्याच्या त्या काळी असलेल्या संपन्नतेच्या विचारात मग्न होतं. पन्नास साठ माणसं इथे एकत्र राहत असतील, अनेक सण समारंभ, सुख दुःखाचे प्रसंग त्यांनी अनुभवले असतील. या वाड्याला बोलता येत असतं तर वाड्यात केलेली खलबतं,घडलेले प्रसंग, हळदीकुंकू समारंभ सगळं सगळं त्यानं बोलून दाखवलं असतं.
फडणवीस कुटुंबाने हा ठेवा पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिला आणि उत्तम व्यवस्थापन केलंय याबद्दल त्यांचे आभार मानायला हवे. तिथल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं की अजून बरेच काही उपक्रम इथे सुरु होणार आहेत, दुरुस्ती नंतर काही भागही खुला होणार आहे.या सगळ्यामुळे वाड्याच्या सौंदर्यात भरच पडेल यात शंका नाही. मोठे रेखीव चौक, कोनाडे, खिडक्या, लाकडी कमानी, सारवलेली जमीन, सागवानी बांधकाम सगळं मोहवून टाकणारं आहे. जाताना मोडी लिपीत आपलं नाव लिहून ते souvenir घेऊन आम्ही वाड्या बाहेर पडलो. मागे नदीच्या घाटावर नेहमी प्रमाणे फेरफटका मारला.
पण वाड्यात केलेली भ्रमंती खूपच समाधानकारक आणि देखणी होती. प्रत्येकाने एकदा तरी ही भ्रमंती करावी अशीच आहे .
प्रिया साबणे - कुलकर्णी.
२० फेब्रुवारी २०२२
Comments
Post a Comment