नवे वर्ष : सातारा भ्रमंतीचा नवा अध्याय !
सातारा जिल्ह्यातील भटकंतीचा हा पुढचा अध्याय. तसं फिरायला आम्हाला आवडतंच ,त्यातून सातारा म्हणजे weak point. वर्षाच्या सुरुवातीचा मुहूर्त अचानक ठरवला आणि नव्या वर्षाच्या उगवत्या सूर्याच्या सोबत निघालो. सातारा म्हणजे निसर्गरम्य ठिकाणांची खाण, त्यातलाच एक हिरा म्हणजे आज आम्ही पाहिलं ते ठिकाण.... काठी.
साताऱ्यात सज्जनगड रस्त्यावरून ठोसेघरच्या रस्त्याला जायला सुरुवात केली की लागतं चाळकेवाडी. शेकडो पवनचक्क्या असलेलं हे भन्नाट ठिकाण. निळ्याशार आकाशाच्या backdrop वर फिरणाऱ्या या पवनचक्क्या बराच काळ आपली सोबत करतात.पुढे पाटण चा रस्ता धरला की काठी गाव लागतं.त्याहून पुढे गेलं की खाली अवसरी गाव लागतं आणि त्या गावाकडे न वळता पुढे गेल्यावर एक भन्नाट दृश्य बघायला मिळतं. उजवीकडे पाटी दिसते बॅकवॉटर केबिनची. तिथेच वळायचं आत. इको फ्रेंडली सामुग्री वापरून इथं कॉटेजेस बांधल्या आहेत. शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य परिसर. कॉटेजेस मागे टाकून पुढे गेलो आणि कोयना बॅकवॉटरचं विहंगम दृश्य दिसलं. विस्तीर्ण पसरलेलं पाणी. मध्ये मध्ये शिरलेले आणि हिरव्या गर्द झाडांची शाल पांघरलेले जमिनीचे भाग. त्या झाडांची सावली पाण्यात पडलेली. सभोवताली उंचच्या उंच डोंगर. रस्ता , वाहनं, माणसं काही काही दूरपर्यंत दिसत नाही. फक्त आपण , निसर्ग आणि नीरवता.
आदल्या दिवशी आलेली मंडळी निघाली होती. आमच्या शिवाय तिथे अजून कोणीच नव्हंत. धुक्याच्या दुलईतून बाहेर येऊन सूर्यप्रकाशाने अवघा परिसर न्हाहून निघाला होता. सूर्याच्या विरुद्ध बाजूला चंद्रही आपलं अस्तित्व टिकवून होता. कितीही वेळ बसावं , कितीही वेळ बघत रहावं ,असं हे ठिकाण. वर्षभराचा ऑक्सिजन भरून घेतला.
तिथून पुढे निघालो राम धारेश्र्वर देवळाकडे. त्यासाठी परत पाटण रस्त्याला मागे यायला लागलं. परत एकदा पवनचक्क्या सोबतीला आल्या. दाते गडाच्या रस्त्यावरून पुढे निघालो. देवदर्शन सहज नसतं म्हणतात. त्याचा प्रत्यय यावा असा रस्ता पार देवळापर्यंत आहे. एक तासाचा रस्ता. बराच वेळ काहीही पाटी वगैरे नाही. नेहेमीप्रमाणे गूगल बंद. रस्त्यात चुकून एखादी गाडी आली , माणसं दिसली की त्यांना विचारात विचारात देऊळ गाठलं. देवळाच्या दोनशे मीटर अलीकडेच एक पाटी आहे. त्यावर इथून पुढे वाहनं जाऊ शकत नाहीत असं लिहिलंय. पुढे रस्त्यात फक्त नंदी दिसला. मग थोडं पुढे एक महिरप आणि त्यात पण नंदी. देऊळ काही दिसेना म्हणून पाटी वाचूनही गाडी घेऊन पुढे गेलो. पण एक छोटी गुहा आणि तिथे काही देव देवता दिसल्या. काही ठिकाणी नुसतेच हात कोरले आहेत. काहीही लिहिलेलं दिसलं नाही. हे देऊळ असावं का ? असा विचार येत होता आणि नजर थोडी पुढे गेली. कानांवर लाऊड स्पीकरचा आवाज पडला. गाडी लावून पुढे चालत गेलो. डोंगरावरून खाली येणाऱ्या पाण्याच्या धारा आणि खाली एक मोठी गुहा. माकडं होतीच. त्यामुळे हातात काहीही न घेऊन जायचं पथ्य पाळलं.
आत शंभर दोनशे माणसं सहज बसतील अशी गुहा आहे. त्यात राम धारेश्र्वराचं मंदीर आहे. आज तिथे कसलंस पारायण सुरु होतं. निर्मनुष्य रस्ता बघून आत इतकी माणसं असतील असं वाटलंही नव्हंत. लाऊड स्पीकरचा आवाज कर्कश्य होता आणि त्या देवळाच्या परिसराला अगदी प्रतिकूल होता.
गुहेत मधोमध काळ्या पाषाणातले तीन नंदी आणि पिंड आहे. त्याच्या उजवीकडे पाच पांडव, वीरभद्र ,राम, लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. विशेष म्हणजे राम आणि लक्ष्मण यांची फक्त शीरं आहेत. अशी अख्यायिका सांगितली जाते की रावण वधानंतर ब्रह्म हत्या पापक्षालन करायला श्री राम इथे आले. अधिश्र्वर महाराजांनी रावणासारख्या शंकर भक्ताला मारल्यामुळे पापातून मुक्ती देण्यास रामास नकार दिला. तेव्हा त्यानं आपलं शीर वेगळं केलं आणि नंतर गुरूंनी रामास पापातून मुक्ती दिली.
याशिवाय पांडव देखील येथे येऊन तपश्चर्या करून गेले असे म्हटले जाते. या मूर्ती बघितल्यावर शेजारी सप्त मातृका यांच्या मूर्ती आहेत आणि तिथेच छोटं पाण्याचं कुंड आहे. निपुत्रिक जोडपी इथे येऊन दर्शन घेतात आणि पाण्यात हात घालून प्रार्थना करतात. त्यांची इच्छापूर्ती होते असंही इथे समजलं. त्याच्या जवळ चार पायऱ्या चढून गेल्यावर मुख्य पिंड आहे. या पिंडेची दर काही वर्षांनी वाढते असं सांगितलं गेलं. या मोठ्या गुहेला लागून अजून एक दोन गुहा आहेत. आज तिथे प्रसाद बनवणं चालू होतं. देवळातून बाहेर आल्यावर छान छोटी दीपमाळ आहे. वरती काही पायऱ्या चढून जात येतं. वरून पडणाऱ्या पाण्याच्या धारा त्यामुळे धारेश्र्वर नाव पडलं असणार आणि रामाच्या अख्यायिकेमुळे राम धारेश्र्वर.
प्रवचन आणि महाप्रसाद आणि लाऊड स्पीकर वगळलं तर अतिशय छान आणि बघण्यासारखं मंदीर आहे. पावसाळ्यात तर हा परिसर अजूनच देखणा दिसत असणार.
आलो त्याच रस्त्याने बॅकवॉटर केबिनला आम्ही परत गेलो. तिथं जेवण सांगितलं होतं. इको फ्रेंडली डायनिंग हॉल मध्ये साधं जेवण जेवलो. बाकी कोणीच नसल्याने आचारी आणि त्याचा मुलगा दोघे गप्पा मारत बसले. त्यांच्याकडून धारेश्र्वर चे पाणी खूप पवित्र असल्याचे समजले. देवळातल्या कुंडात मागितलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असंही गावकरी मानतात. गावात या देवालाही खूप मानतात असंही समजलं.
आम्ही ताटात काहीही न टाकता जेवण करून उठलो याचं त्यांना विशेष कौतुक वाटलं आणि ते त्यांनी बोलून दाखवलं. अनेकदा तयार करायला लावलेलं जेवण माणसं वाया घालवतात. मग ते टाकून देणं कसं जीवावर येतं,इथपासून ते या रिसॉर्ट मध्ये येऊन निर्मळ आनंद कसा अनुभवता येतो अश्या सगळ्या गप्पा झाल्या.
निघताना पुन्हा एकदा कोयना बॅक वॉटरचं ते अशक्य भारी दृश्य बघायला गेलो. अजून थोडा वेळ असेच थांबलो आणि मग परतीचा प्रवास सुरू केला.
वर्षाचा पहिला दिवस, नवी ठिकाणं बघितली, नवी माणसं भेटली, नव्या अख्यायिका समजल्या, आमचं आवडतं सातारा अजून एका नव्या रूपात आम्हाला पुन्हा दिसलं. नव्या वर्षात ही अशी भटकंती सुखरूप चालू राहू दे,हेच मागणं धारेश्र्वरच्या कुंडात आम्ही मागून आलोय.
प्रिया साबणे - कुलकर्णी.
१ जानेवारी २०२३.
Comments
Post a Comment