पळसदेव !
वर्षातले काहीच ,अगदी दोन एक महिने एका मंदिरात जाऊ शकतो. उरलेले सर्व काळ हे मंदिर पाण्यात गुडूप असतं. बाराव्या शतकात बांधलेलं हे हेमांडपंथी मंदिर बघायला गेल्या वर्षी याच ठिकाणी जाऊन आलो. पण त्यावेळी पाणी बऱ्यापैकी होतं त्यामुळे मंदिराचा कळस कसाबसा दिसत होता.तेव्हाच ठरवलं की परत एकदा इथं यायलाच हवं.
यावेळी पाणी ओसरले आहे ,हे खातरजमा करूनच पुणे सोलापूर महामार्गावर मार्गक्रमण केलं. भिगवण नंतर साधारण वीस किलोमीटर वर इंदापूर तालुक्यात पळसदेव गावात पोहोचलो. या छोट्या गावाच्या कमानीतून सरळ आत जात राहिलं की साधारण दहा मिनिटात आपण उजनी धरणाच्या बॅकवॉटर जवळ येऊन पोहोचतो. गेल्या वर्षी जिथवर पाणी होतं तिथून यावेळी बऱ्यापैकी आत गेलो. वर्षातले बाकीचे महिने हा सगळा परिसर पाण्याखाली असल्याने हा रस्ता मात्र अत्यंत खडकाळ आहे. खड्डे , मोठे दगड, भरपूर शिंपले पार करत आपण पोहोचतो ते अश्या ठिकाणी इथून पळसनाथाचं मंदिर दिसतं. निळ्याशार आकाशाच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर खूपच विलोभनीय दिसत होतं. भिगवण कडून हायवे वरून पळसदेव कडे जाताना डाव्या बाजूला लांबवर हे देऊळ दृष्टीस पडतं आणि आपल्या मनात एक कुतूहल निर्माण होतं. प्रत्यक्ष तिथे पोहोचल्यावर देऊळ समोर दिसत होतं पण त्याच्या आजूबाजूला पाणी होतं. तिथवर जाण्यासाठी बोटी उपलब्ध होत्या. माणशी दोनशे रुपये घेऊन पाच मिनिटात या बोटी आपल्याला मंदिरापाशी नेऊन सोडतात.
आता आजूबाजूला दिसतात भग्नावशेष. उत्तम कोरीवकाम केलेले स्तंभ आहेत,वीरगळी आहेत, मूर्ती आहेत, तट आहेत. मात्र सगळं अवशेषांच्या रुपात.
शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर २००१ साली दुष्काळ पडला तेव्हा पाणी बऱ्यापैकी ओसरल्यामुळे बघायला मिळालं. १९७७-७८ च्या सुमारास भीमेवर नव्याने बांधलेल्या उजनी धरणात पाणी साठू लागताच भिगवण ते कांदलगाव दरम्यान नदीकिनारी असलेल्या परिसरातील अनेक गावे या धरणाच्या पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आणि त्यातून ती विस्थापित झाली. यामध्ये पळसदेव आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक मंदिरेही पाण्याखाली गेली. ती मात्र अर्थात विस्थापित झाली नाहीत. मात्र पळसनाथ मंदिरातील शिवलिंग आणि नंदी यांची गावात नवे मंदीर बांधून स्थापना करण्यात आली. मागच्या वेळी आलो होतो तेव्हा हे नवं मंदीर आम्ही बघितलं होतं. सध्या बांधल्या जाणाऱ्या मंदिरांसारखे हे मंदिर भव्य दिव्य आणि रंगीबेरंगी आहे.
जुनं मंदिर मात्र हेमाडपंथी बांधणीतील आहे. सभामंडप, सप्तभूमीज पद्धतीचे शिखर, कोरीव छत, गर्भगृह, अशा स्वरूपातील हे मंदिर इतिहास किंवा मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार यात शंकाच नाही.
हे मंदिर चालुक्यकालीन असावे असा अभ्यासकांचा दावा आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख मिळतो. तसेच या काळातच या मंदिराभोवती तट व ओवऱ्या बांधल्या गेल्या, त्यातील एक ओवरी अजूनही बघायला मिळते. लांब विटांनी ही बांधली आहे. दहा बारा कमानी आहेत.
पळसनाथ मंदिराच्या अगदी जवळ अजून एक मंदीर आहे. ते बळीचे आहे असं सागितलं जातं. काही जण ते विष्णू चं आहे असंही सांगतात. आम्ही गेलो तेव्हा दोन्ही मंदिरात गर्भगृहात पाणी होते त्यामुळे आत जाता आलं नाही. मंदिराचा कळस खूपच वेगळा आहे. कळसावर अगदी वरती अत्यंत सुदंर कोरीव काम केलेला गोलाकार भाग आहे. जणू त्यात पाकळ्यांचा भास होतो.मंदिराचे छत मोठे आहे. काही पर्यटक चक्क कळसावर चढून ,गॉगल घालून, कैक पद्धतीच्या पोझ देऊन फोटो काढत बसले होते. आधीच हा सुरेख शिल्पकलेचा आविष्कार वर्षात काही काळच बघायला मिळतो. पाण्याखाली असल्याने मुळात हे शिल्पकाम खूप छान स्थितीत नाही. अश्यावेळी ते आपल्याकडून अजून जास्त बिघडू नये किंबहुना आपल्याकडून त्याची अजून जास्त विटंबना तरी होऊ नये एवढी किमान गोष्ट पर्यटक म्हणून आपण करायलाच हवी. तेही होतं नाही हे बघून मन सुन्न झालंच पण अत्यंत पराकोटीची मनस्वी चिडचीड झाली.
मंदीर परिसर चारही बाजूनी फिरून बघितलं. थोड्या अंतरावर एक रामाचं मंदीर आहे. तेही पाण्याखाली असतं. सगळ्या मंदिरात देव नाही. पूजा अर्चा अर्थातच होत नाही. कधी काळी ऐश्वर्य, पावित्र्य, मंत्रोच्चार, उत्सव आणि भक्तिने भारलेलं वातावरण या वास्तूने अनुभवलं असणार. आपल्या हातून इतका उत्तम उकृष्ट शिल्पकलेचा नमुना घडला असं त्याच्या निर्मात्याला वाटलंच असणार.त्यानंतर सुमारे ८०० वर्षांनी याच वास्तूला आज एकाकीपण वाट्याला आलं आहे. काही काळ जेव्हा हे मंदिर मोकळा श्वास घेतं तेव्हा मात्र इथं येणं चुकवू नये.
मंदीर बघून परत बोटीने निघालो. नावड्याला विनंती करून मंदिर बोटीने परत चारही बाजूनं बघितलं.गाडीपाशी आलो. परतत असताना अनेक वेगवेगळे पक्षी बघायला मिळाले. असंख्य बगळे होते.काही मंडळी मासेमारी करत होती. थोड्या वेळ थांबून परतीच्या मार्गावर निघालो. 'Near Pune' या संग्रहात अजून एका ठिकाणची भर पडली. पळसनाथाच्या मंदिराच्या परिसरात दोन झाडं आहेत. जिवंतपणाची कुठलीही लक्षणं त्यात नाहीत. पण तरीही ही दोन झाडं मंदिराला सतत साथ देत उभी आहेत. मंदिराच्या वैभवसंपन्न दिवसाची ती मूक साक्षीदार आहेत.
प्रिया साबणे - कुलकर्णी.
११ जून २०२३.
Comments
Post a Comment