शाळा....

 आपल्या आयुष्याचा "आठवणी "या अविभाज्य घटक असतात. काही चांगल्या, काही नकोश्या,काही अवघडलेपण देणाऱ्या. या सगळ्याचा एक कोलाज असतो आणि अचानक कधीही तो डोकं वर काढतो. या आठवणींना कधी चेहेरा असतो, कधी भावना, कधी जागा किंवा ठिकाण , कधी वास , कधी चव ,कधी आवाज ,तर कधी स्पर्श.या प्रत्येक अनुभूतीतून त्याच्याशी निगडीत आठवण येते. अगदी नकळतपणे. आठवणींच्या या हिंदोळ्यावर मला कायमच झुलायला आवडतं. 


आज माझ्या प्राथमिक शाळेत गेले. निमित्त होतं नवीन मराठी शाळेचं शतकोत्तर रौपयमहोत्सवी वर्षात पदार्पण. पुण्यात असूनही चौथीनंतर इतक्या वर्षांनी त्या वास्तूत गेले. अनेक आठवणींची ही जागा. असं ठिकाण जिथे आयुष्याचा अगदी सुरुवातीचा काळ घालवला.सुंदर, दगडी दोन मजली इमारत, जिना आणि व्हरांडा याला असलेला  रेखीव लाकडी कठडा, मोठ्याला खिडक्या ,प्रशस्त असेम्ब्ली हॉल, गायन वर्ग, चित्रकलेचा वर्ग, शाळेची घंटा जिथे बांधली होती ती जागा, मुख्याध्यापकांची खोली, शिक्षकांची खोली, बँड साठी खास असलेली जागा, हस्तव्यवसाय वर्ग, तिथलं चिंचेचं झाड. या सगळ्या फक्त जागा नाहीत तर आठवणींचे अनेक कोपरे आहेत. आज शाळेत वर्ग मैत्रिणींसोबत प्रत्येक ठिकाणी जोडल्या गेलेल्या प्रत्येकीच्या आठवणी होत्या. आठवणी नुसत्या काढल्यावर आनंद मिळतोच पण त्या एकमेकींशी त्या वास्तूच्या सानिध्यात व्यक्त करतो तेव्हा त्याचा आनंद शब्दातीत. 


वर्गाच्या भल्या मोठ्या खिडकीतून दिसणारं शाळेचं मैदान, मैदानात असलेलं अजून एक चिंचेचं झाड आणि त्याचा पार आठवला. पावसाळ्यात तिसरीच्या करमरकर बाईंनी पुस्तकातली पावसावरची शिकवलेली  आठवली.सुरेख सोप्या चालीत ती कविता म्हटलेली आठवली. खरं तर वर्ग आणि खिडक्या सोडल्या तर बाकी काहीच नव्हतं आज .पण आठवणींनी मनाला मात्र काळ वेळाचं बंधन सोडून सगळं काही परत अनुभवायला दिलं. 


शाळेत बुचाचं झाड होतं मोठ्ठं. आवारात वाळूवर अलगद पडलेली बुचाची फुलं वेचलेली आठवण इतकी ताजी झाली की बुचाची फुलं आता नव्हती ,पण सगळा आसमंत फुलांच्या वासाने भरून आणि भारून गेला. या फुलांच्या वासाची आठवण माझ्या मनात इतकी ताजी आहे की कुठेही हा वास आला तरी माझं मन शाळेत जाऊन पोचतं.आम्ही शाळेत असताना ससे होते शाळेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र पिंजरा होता. आज तोही नव्हता ,पण त्या ठिकाणावरून जाताना तेव्हा पिंजऱ्याजवळ  येणारा तो विशिष्ट वास आला. मातीकामाच्या वर्गात गेलो तर वर्ग जसाच्या तसा होता. तिथं बसल्या बसल्या मातीचा नेहेमी येणारा वास आला.दुसरीच्या आमच्या वर्गाबाहेर एका खिडकीत एक कायमस्वरूपी औषधाची बाटली ठेवलेली असायची. मी मुळात धडपडी असल्यानं औषध लावायची वेळ माझ्यावर अनेकदा यायची. आयोडीनचा तो वास आठवणीत आहे. पुढे कॉलेज मध्ये chemistry lab मध्ये काम करताना आयोडीन कधी वास आला तरी मी क्षणार्धात शाळेत जाऊन पोचायचे. आज ती बाटली नव्हती पण मला आयोडिनचा वास आला. आठवणी आणि वासाचं इतकं गुळपीट आहे की या सगळ्या वासाच्या नुसत्या आठवणीने तो काळ प्रत्यक्ष अनुभवल्याचा निखळ आनंद आज मिळाला.


आमच्या पूर्व प्राथमिक शाळेचं आवार प्राथमिक शाळेच्याच आवारात आहे. तिथं आमच्या वेळी असलेलं जंगलजीम, घसरगुंडी सगळं आता कुंपणाच्या आत गेलंय. आमच्या वर्गखोल्यांनी देखील नवीन इमारतीमध्ये आपलं जुनं रूप बेमालूमपणे झाकून टाकलंय. पूर्वीचं मोठ्ठं मैदान अनेक इमारतींनी वेढून गेलंय आणि त्यामुळं काहीसं लहान वाटतंय. सगळ्यात वाईट वाटलं ते चिंचेच्या डेरेदार झाडाचा हरवलेला पार बघून. हे शाळेच्या आवारतलं दुसरं चिंचेचं झाड. शाळेचे अनेक ग्रुप फोटो यालाच backdrop ठेऊन काढलेले. प्रगती आवश्यक आहे आणि सोय पण महत्त्वाची आहे. त्यानुसार बदल होणारच. पण तरी आठवणीत कोरलं गेलेलं ते ठिकाण पुसता येत नव्हतं हे खरं. तिथल्या चिंचा आणि चिंचेचा पाला खाल्यावर जीभेवर रेंगाळत राहणारी चव आठवली. अगदी चिंच खाल्याचा भास व्हावा इतकी आठवली.


गायन वर्गात गेल्यावर गायन गुरुजींची आठवण येणं अपरिहार्य होतं. व्यक्तिमत्त्व धीरगंभीर आणि कडक असलं तरी काही मजेशीर टिप्पणी ते करायचे.  त्यांनी शिकवलेलं केशवा माधवा आणि नारायणा रमारमणा किंवा जय गंगे भागीरथी अशी नाटयपदं आठवली. अगदी ऐकू आली त्यांच्या आवाजात. इयत्ता चौथीत अशी अवघड गाणी शिकवणं आणि आपण ती शिकणं हे सगळं वेगळंच होतं.


एका ठराविक ठेक्यात बँड पथक वादन करायचं. बँड स्टँड पूर्वी होता तिथून थोडा वेगळ्या जागी गेला आहे. पण तो बघताच बँड चा ठेका कानात ऐकू आला. शनिवारी सकाळची शाळा सुटल्यावर आमचे रिक्षाचे गोखले काका इतर शाळेच्या मुलांना सोडून जरा उशीरा यायचे. ते येईपर्यंत आम्ही असेम्ब्ली हॉल मध्ये मागे दोन मोठी टेबल्स होती तिथे खेळत बसायचो.  तेव्हा ते येऊन खणखणीत हाक मारायचे. ती हाक ऐकू आली ....अगदी जशीच्या तशी. शाळेची आरोळी म्हणा म्हटल्यावर जोशात आणि बेंबीच्या देठापासून म्हटलेली सामूहिक आरोळी ऐकू आली. या सगळ्या आवाजांनी अनेक आठवणी ताज्या झाल्या. 


शाळेतली माझी सर्वात आवडती जागा होती सुसज्ज वाचनालय. पुष्कळ पुस्तकं आणि वाचण्यासाठी असलेल्या छोट्या लाकडी टेबल खुर्च्या. पूर्वी जिथे वाचनालय होतं तिथे आता इंग्रजी माध्यमाची नवी इमारत झाली आहे. पण तिथून जाताना ती नवी इमारत मनात साफ पुसली गेली आणि तिथे आमचं वाचनालय दिसलं मला. थोडं पुढे गेल्यावर त्या वेळच्या आमच्या मुख्याध्यापिका पावगी बाई यांचं घर होतं ते पण आता नाही. असेम्ब्ली हॉल जवळ असलेलं जंगलजीम आणि खेळायची साधंनं मात्र जशीच्या तशी होती. मन त्यावर काही वेळ  खेळून देखील आलं. आमच्या वेळी असलेले प्रयोग शाळा , हस्तव्यवसाय वर्ग नव्या इमारतीत हरवले आहेत खरंतर ,पण आठवणीच्या कप्प्यात अगदी जसेच्या तसे आहेत. त्या वेळी मुख्याध्यापिका बसायच्या त्या ऑफिस मध्ये प्रवेश सहज नव्हता. आजही आत पाऊल टाकताना एक क्षण ती हुरहूर जाणवली. काही आठवणी किती जिवंत असू शकतात त्याचा प्रत्यय आला. 


आज कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या आवडत्या बाई दिसल्या ...भेटल्या. काही ओळखू आल्या ,काहींना ओळखायला वेळही लागला. काही आज हयात नाहीत, काही वयोमानामुळे येऊ शकल्या नाहीत. आधीच्या सगळ्या मुख्याध्यापकांच्या फोटोत पावगी बाईंचा फोटो पाहिला. क्षणभर भरून आलं. 


आज खरं तर मोठा कार्यक्रम होता. नव्वदी पासून पंचविशी पर्यंत सगळे माजी विद्यार्थी होते. प्रत्येक बॅचचे दोन - तीन प्रतिनिधी होते. अनेक पिढ्या ,पण आठवणी अगदी सारख्याच. शाळेच्या त्या त्या जागा, शाळेची शिस्त, शाळेची आरोळी, शाळेचे स्नेहसंमेलन, असेम्ब्ली हॉल मधले कार्यक्रम. सगळ्या पिढ्यांचे प्रतिनिधी सारख्याच आठवणींच्या भाषेत बोलत होते. त्याने वयाची आणि पिढ्यांची अंतरं काहीकाळ मिटवून टाकली. सतीश आळेकर यांच्यासारखे रंगकर्मी माजी विद्यार्थी आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांचं भाषण आम्ही लहान असतो आणि शाळेचे आजी विद्यार्थी असतो तरीपण आम्हाला  कंटाळवाणं झालं नसतं इतकं मस्त झालं.


आमच्या म्हणजे १९९१ सालच्या बॅचच्या प्रतिनिधी म्हणून मी, सायली आणि गीता अश्या तिघी होती. त्यामुळे तिघी मिळून जेव्हा शाळा फिरलो तेव्हा आठवणींचा पूरच आला. शाळेची घंटा वाजली की लाकडी कठड्यावर कान लावून त्याचा नाद ऐकण्याची गीताची आठवण.व्हरांड्यात बसून पाय खाली सोडून घावळेला वेळ आणि खाल्लेला डबा ही सायलीची आठवण. शाळेतील कार्यक्रमांना बोलावलेल्या पाहुण्याच्या लांबलेल्या भाषणावेळी मातीत बसून गोळा केलेले दगड आणि मातीत काढलेली चित्रं,कागदाचे बोळे करून मुले विरुद्ध मुली अशी केलेली तुफान मारामारी, जिन्यात जाताना वरती टांगून बसलेली वटवाघूळ ...... सगळं काही आठवलं. काही गोष्टी विस्मरणात गेलेल्या पण एकमेकींच्या आठवणीतून सगळं काही आठवत गेलं. शाळेच्या आवारात दिसलेल्या खारुताई बघून तर त्यांना कॅमेऱ्यात बंद करायचा मोहं सायलीला आवरता आला नाही.


कार्यक्रम चालू असताना  हाताची घडी तोंडावर बोट, नीट ताठ बसा अश्या बाईंच्या मुलांना दिलेल्या सूचना अगदी आमच्या वेळी पण तश्याच होत्या .त्या परत ऐकून मज्जा वाटली. मोठ्या बाई, हस्तलिखितं  हे शब्द तर कैक वर्षांनंतर ऐकले. 


असं असलं तरी मला कळतंच नव्हतं की शाळेच्या कार्यक्रमात मी नक्की मनाने पूर्णवेळ होते का नाही ? स्थळ, काळ,वेग सगळ्या मर्यादा पार करून मनाने मी ज्युनिअर के जी पासून चौथी पर्यंत अनेक क्षण परत जगून आले. चौथीच्या वार्षिक परीक्षेच्या आधी मी जबरदस्त आजारी पडले होते आणि परीक्षाच बुडाली. पण नंतर मे च्या सुट्टीत आजारी पडलेल्या सगळ्या मुलांची वेगळी परीक्षा घेतली गेली आणि माझं घोडं गंगेत न्हालं. पुढे अहिल्यादेवी शाळेचा पाचवीपासून प्रवास मार्गी लागला. चौथी मध्ये send off असेम्ब्ली हॉल मध्ये झाला होता. तेव्हा अल्पोपहार घेतला होता त्या नंतर आज परत तिथे बसून जेवणाचा योग आला. पोट भरलं, आठवणींचा नवीन घडा भरला. मन तेवढं भरलं नाही. 


पुन्हा त्या वेळेला परत आणायची जादू  येत असती तर नवीन मराठी शाळेतले ते दिवस परत आणले असते मी. गायन, वादन ,नृत्य,चित्रकला, हस्तव्यवसाय, बागकाम, वाचन , खेळ, प्रयोग या सगळ्या उपक्रमातून आम्ही शिकत गेलो. यालाच सध्या नव्या शिक्षण प्रवाहात अनुभवातून शिक्षण म्हणतात. शाळेनं आमच्या नकळत हेच केलं. शाळेनं शिकतं केलं, शाळेनं आयुष्यभराचं मैत्र दिलं,सुरेख आठवणी दिल्या, बालपण साजरं केलं. 


शाळेत चौथीत एक गणपतीची मूर्ती प्रत्येकाला देतात. ती साच्यातून काढलेली मूर्ती इतकी लोभस आणि छोटी असते की चौथीतल्या मुलाच्या इवल्याश्या हातात मावते. आठवणींच्या पोतडीतून ही शेवटची आठवण बाहेर आली. त्या पांढऱ्या शुभ्र मूर्तीसारखी ताजी आणि सुबक आठवण. 


प्रिया साबणे कुलकर्णी

४ जानेवारी २०२३

Comments

Popular posts from this blog

लूडो

एका ' कटा 'ची गोष्ट

पळसधरी