कोकण.....परत एकदा

 वर्षानुवर्षे कोकणात जात असलो तरी प्रत्येक वेळी ते नवं वाटतं. समुद्र,सुंदर किनारे,लाल माती,शहाळी,मोदक, मासे, मिरगुंड, कोकम या सगळ्या पलीकडे खूप काही आहे आणि प्रत्येक वेळी त्यातलं काही ना काही गवसतं.त्याच ठिकाणी परत गेलो तरी नवं काही अनुभवून येतोच येतो. तसाच अनुभव यावेळीही आला. अगदीच आयत्यावेळी ठरलं आणि आम्ही कोकण गाठलं. अडीच दिवसात आधीच दोन वेगळ्या ठिकाणी गेल्याने  वेळ अगदी कमी पण तरीही नवं काही बघण्याची ओढ होती. दरवेळी जाऊनही जी दोन ठिकाणं राहिली होती ती बघायची होती. कुडाळ वरून पंधरा किलोमीटवर असलेलं वालावल. वालावलचं लक्ष्मीनारायण मंदिर फोटो आणि व्हिडिओत बघितलं होतं. पण तिथे जाऊन प्रत्यक्ष बघणं हा नितांत सुंदर अनुभव असणार होता. कुडाळ मध्ये बांबू हस्तकला केंद्र आहे अशी कुणकुण लागली होती आणि "परत इतक्या लांब कशाला येतोय", असं म्हणत त्या केंद्राला भेट देणं नक्की केल. गाडी कुडाळ च्या MIDC मध्ये घातली. वाट वाकडी करून गेलो खरं पण इंटरनेट ने साथ सोडली आणि offline map download न केल्यामुळे वारंवार गाडी थांबवून रस्ता विचारणे सुरू झालं. एक तर बांबू केंद्राचा नक्की पत्ता ठाऊक नव्हता, त्यामुळे जे काय चार दोन कारखाने आहेत त्या सगळ्यांचे पत्ते आम्हाला सांगितले जात होते. गेल्या अनेक वर्षात कोकण खूप बदललं पण पत्ता विचारताना येणारे अनुभव मात्र आजही जसेच्या तसे. एकाला विचारायला जावं तर आजूबाजूचे चार दोन लोक जमा होतात आणि सर्वानुमते पत्ता सांगितला जातो. "हे इथे जवळच असा" असं सांगितलं म्हणजे वीसेक मिनिटांचा रस्ता आहे हे आता न कळण्याऐवढे आम्ही पूर्वीचे राहिलो नाही. इंटरनेट च्या युगात pre Google map era चा अनुभव घेत घेत मजल दर मजल करत एक दोन बांबू कारखाने पालथे घातले आणि दोन सुरेख मोढे गाडीत विराजमान झाले. आता या सगळ्या प्रकारात वालावल यायला जरा जास्तच वेळ लागला. कर्ली नदीच्या काठी वसलेलं वालावल हे गाव. ऐन दुपारी मंदिराजवळ गाडी थांबली. लांबून दिसलेली मंदिराची झलकच इतकी सुरेख होती की लगबगीनं मंदिरात प्रवेश केला. अत्यंत देखण हेमाडपंथी प्रशस्त मंदिर. शांत आणि स्वच्छ. एका रेखीव कमानीतून आत गेलं की संपूर्ण परिसर दिसतो. नारळाची झाडं आणि तलावाच्या backdrop वर हे मंदीर जास्तच खुलून दिसतं.दीपमाळा, लाकडी बांधणी,भव्य सभामंडप आणि आत मुख्य गाभारा. आता गेल्यावर विलक्षण प्रसन्नता जाणवली. चौदाव्या शतकात हे मंदीर बांधलं गेलं असलं तरी लक्ष्मीनारायणाची मूर्ती त्याहून जुनी आहे असं सांगितलं जातं. वालावलला ऐतिहासिक महत्त्व आहे.आम्ही गेलो तेव्हा आमच्या शिवाय मंदिरात कोणीच नव्हतं. लाकडी कौलारू छत हे सागवानापासून बनवलं आहे आणि छतावर सुंदर लाकडी कोरीवकाम बघायला मिळतं. गर्भगृहात प्राचीन लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे आणि समयांच्या प्रकशात ती अजूनच प्रसन्न वाटत होती. देवाची पालखी देखील आहे. देवाचे आणि देवळाचे फोटो काढू नयेत असा फलक कुठेच नाही पण प्रत्यक्ष तिथे जाऊन डोळ्यात हे देवालय साठवावे. प्रदक्षिणा मार्गावर असलेला स्वच्छ तलाव आणि बांधलेला आखीव रेखीव काठ,आजूबाजूला असलेली नारळाची झाडं आणि हिरवाई निःशब्द करते. आपसूक थोड्यावेळ शांत बसावं असं वाटतं. प्रदक्षिणा मार्गावर दोन छोटी मंदिरं आणि मागच्या बाजूला भक्तनिवास आहे. संपूर्ण परिसर स्वच्छ आहे. प्रदक्षिणा करून ,मनोभावे दर्शन घेऊन देवळाबाहेर आलो. प्रसादाच्या साखरेचा गोडवा आणि मनात प्रसन्नता घेऊन आम्ही धामापूर कडे निघालो. 

 "धामापुर" , कुडाळ मालवण रस्त्यावर असलेलं अतिशय टुमदार गावं. गावामध्ये भगवती देवीचं

सुंदर मंदीर आहे आणि मंदिरा शेजारीच अप्रतिम असा तलाव आहे. एखद्या गावा बद्दल आपण कधीतरी काहितरी वाचतो किंवा ऐकतो आणि त्याच्या विषयी अप्रुप वाटतं आणि त्या गावाला भेट देण्याची ओढ लागते.धामापूर विषयी तसंच झालं. दोन वर्षापूर्वी ऐकलेल्या या गावाला कधीतरी जाऊन यावं असं सारखं  वाटत होतं अणि तो योग आज आला.  कुडाळ - मालवण रोड वर,एका वळणावर रस्त्याला लागूनच मंदिराची कमान आहे. काही पायऱ्या चढून गेल्यावर साधारण १५ व्या शतकातील मंदिरात आपण प्रवेश करतो. मंदिरात सुरवातीला एक मोठा सभामंडप आहे.त्या मध्ये आठ मोठे खांब आहेत. त्यानंतर एक छोटा मडंप .त्या मध्ये ४ खांब आहेत.आणि मग मुख्य देवी मंदिर. परिसर जरी रस्त्याच्या अगदी जवळ असला तरी आत मध्ये शांतता जाणवली. याही मंदिरात फारशी वर्दळ नव्हती. मंदिराच्या उजव्या बाजूला प्रचंड मोठा धामापूर लेक आहे. बाहेरून जाणवतही नाही की आत एवढा भव्य तलाव असेल. अगदी आ वासून तो तलाव बघत असताना एक वयस्कर गृहस्थ आमच्याशी बोलायला आले. धामापूर जवळ असलेल्या मोगरणे गावातले ते रहिवासी. त्यामुळे गेल्या चाळीस पन्नास वर्षांचा बोलता इतिहास ऐकायला मिळाला. तीन डोंगराच्या मध्ये असलेला हा तलाव आत्ता पर्यंत कधीही कोरडा पडलेला नाही. तलावाच्या बाजुला असलेल्या डोंगरावर घनदाट झाडी आहे. तलावाच्या कडेकडेनं गेलं तर चार छोटी छोटी गावं लागतात ,त्यातलं एक मोगरणे. कधी काळी भरपूर मोगऱ्याची झाडं गावात असल्यानं हे नावं पडलं , असं त्या काकांनी सांगितलं .ज्या डोंगरांनी तलावाला वेढलं आहे तिथे अतिशय दुर्मिळ पक्षी आणि वनस्पती आहेत. एक पूर्ण ecosystem develop झाली असल्यानं हा तलाव कधी कोरडा पडत नाही. तलाव आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर याविषयी अनेक दंतकथा देखील आहेत.

वालावल आणि धामापूर ,दोन्ही मंदीर साधारण एकाच पठडीतली आहेत. दोन्हीकडे शांतता आणि स्वच्छता आहे आणि प्रसन्न वाटतं. कोकणात जाऊन समुद्रकिनारी न जायची ही पहिलीच वेळ. पण तरीही समाधान वाटलं. महाराष्ट्रात आणि भारतात फिरत असताना एक जाणवलं की बहुतांश निसर्गरम्य ठिकाणे ही कुठल्याश्या देवळाजवळ असतात. कोकणात तर समीकरणच आहे . पण या निमित्तानं तिथला निसर्ग अबाधित राहतो. वालावलच्या मंदिरात असलेले खांब आणि कलाकुसर सागवान लाकूड वापरून केली आहे त्यामुळे देवाला वापरलेलं लाकूड जपलं जातं. असं म्हणतात की वालावल मधील लोकं सागवान लाकूड अजिबात वापरत नाहीत उलट त्याचं संवर्धन करतात.  पर्यटकांच्या झुंडी जरी आल्या तरी इथे एक अलिखित शिस्त पाळली जाते. आपण  रूढार्थाने आस्तिक असलो किंवा  नसलो तरी कोकणातली ही मंदिरं आपल्याला खुणावतात. देवळापर्यंत नेणारे नयनरम्य रस्ते, नारळी पोफळीच्या बागा, लाल रस्ते, नदीवरचे पूल,कौलारू घर, कोकणी भाषा सगळं सगळं भावतं. 

भगवती देवळाच्या पायऱ्या उतरून खाली आल्यावर लगेचच एक छोटं हॉटेल आहे. तिथे मालवणी जेवण उत्तम मिळतं. जेवायची वेळ टळून गेली असली तरी भुकेची वेळ टळली नव्हती. म्हणून हॉटेल मध्ये मालवणी जेवणाचा आस्वाद घेतला. बोनस म्हणून "आलेबिले" नावाचा खास मालवणी पदार्थ sweet dish म्हणून ताटात आला. उत्तम जेवण झालं आणि परतीच प्रवास सुरू केला. 

परतीच्या प्रवासात यावेळी न झालेली ठिकाणं परत येऊ तेव्हा करू हे ठरवलं जातं. "सारखी सारखी देवळ नको बाबा", असं मनात म्हणतोही आपण. गगनबावडा घाट उतरताना मात्र तांबडी सुरला इथलं महादेव मंदीर बघायला हवं यावर शिक्कामोर्तब होतं.मनात घर केलेल्या दोन देवळांच्या भेटीची कहाणी इथे सुफळ संपूर्ण होते.


प्रिया साबणे कुलकर्णी.

८ फेब्रुवारी २०२०.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लूडो

एका ' कटा 'ची गोष्ट

पळसधरी