लूडो

 ओ बेटाजी , किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, याचा अनुभव घेतलेले तुम्ही आम्ही सगळेच. आपल्या प्रत्येकाची गोष्ट वेगळी,स्वप्न वेगळी आणि तिथपर्यंत जाण्याची वाट, ती सुद्धा वेगळी. काहींची स्वप्न पुरी होतात आणि काहींची नाही ,पण तिथपर्यंत चा प्रवास सगळेच करतो आपण. अनेकदा या प्रवासात कोण यशस्वी झाला आणि कोण अयशस्वी हे ओळखण्याचे आपापले निकष असतात. पण प्रत्येकवेळी तेवढेच निकष लावून चालत नाही. दिसतं त्या पलीकडे आणि अलिकडे खूप काही असतं . ते आपल्याला नाही दिसलं तरी ते असतं आणि असं सगळं घडवून आणणारा असतो एक अदृश्य घटक ( ज्याला देव म्हणा, प्राक्तन म्हणा, गेल्या जन्मीचं काही म्हणा). हा घटक आपल्या प्रवासाला दिशा देतो. १०० टकके योग्य आणि अयोग्य असं काही नसतं आणि हेच अधोरेखित करणारा लुडो हा चित्रपट. 

एकदा बघावा असाच आहे हा ludo. पाप आणि पुण्य म्हणजे नेमकं काय . आपण जे पाप समजतो ते खरंच पाप असतं का? आणि पुण्य म्हणजे काय, हे आपल्याला नक्की व्याख्येत बसवता येतं का ? हे आणि असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात जेव्हा ludo चा शेवट होतो. हा खेळ आहे. चार रंगाच्या चार सोंगट्या आणि त्यांची दिशा आणि दशा ठरवणारा एक फासा. Ludo मध्येही अशी चार स्वतंत्र आयुष्य आहेत आणि त्याचा समान धागा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात या समान धाग्याचा भला आणि बुरा वाटा आहे. चार स्वतंत्र प्लॉट सुरू झाल्यावर आपण मनात एक चित्र उभं करतो पण त्याला संपूर्ण काट मारणारा त्याचा शेवट होतो. सगळं कुट्ट काळे  नाही आणि शुभ्र पांढरं नाही. पापा पुण्याचा हिशेब करणारे आपण बुचकळ्यात पडतो. अनुराग बासू स्टाईल , story सांगण्याची त्यांची अनोखी पद्धत भावते. हसत खेळत कुतूहल निर्माण करत जाते. पंकज त्रिपाठी चं असणं ,दिसणं, वावरणं सगळं बाजी मारून जातं. जिवतोडून प्रेम करणं आणि जीवतोडून खुन्नस काढणं या दोन्ही भावना मोजण्याची फुटपट्टी असूच शकत नाही. अभिषेक बच्चन नं आपल्या देहबोलीतून या दोन्ही भावना उत्तम वठवल्या आहेत. जिच्यासाठी जिवाचं रान केलं तिच्या आयुष्यात आपल्याला तसूभरही जागा नाही. आयुष्याचा हा पैलू अनुभवताना अभिषेक नं केलेला अभिनय अफलातून आहे. 

लहानपणापासून आपण खेळत आलोय तो  ludo हा खेळ आता फक्त खेळ राहत नाही.  मनात गाणं सुरूच राहतं... ओ बेटाजी...


प्रिया साबणे - कुलकर्णी.

३ डिसेंबर २०२०.



Comments

  1. खूपच सुंदर लिहिला आहेस सारांश👌👌👌.....मी नक्की बघेन हा चित्रपट 👍👍

    ReplyDelete
  2. छान लिहिलंयस. चित्रपट केव्हा पाहीन कोण जाणे .. अभिषेक बच्चन खूप दिवसांनी acting करतोय . .बघायला हवा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

एका ' कटा 'ची गोष्ट

पळसधरी